मुंबई - भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला विश्वास प्रस्ताव जिंकला आहे. शिंदें गट आणि भाजपाच्या सरकारच्या बाजूने विधानसभेतील १६४ आमदारांनी पाठिंबा देत मतदान केले. तर महाविकास आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ आज अजून घटल्याचे दिसून आले, महाविकास आघाडीच्या बाजूने विश्वासमत प्रस्तावाविरोधात केवळ ९९ आमदारांनी मतदान केलं. तर सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.
काल झालेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. तर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. या मतदानामध्ये मविआमधील अनेक आमदार अनुपस्थित असल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, आज झालेल्या विश्वासमत चाचणीमध्येही कालचेच चित्र दिसून आले. सुरुवातीला आवाजी पद्धतीने मतदान झाले. त्यानंतर मतविभागणीची मागणी झाल्यावर झालेल्या मतदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने १६४ मते पडली. तर विश्वासमत प्रस्तावाच्या विरोधात महाविकास आघाडीकडून केवळ ९९ मते पडली.
दरम्यान, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक आमदार उशिरा आल्याने त्यांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले.