बदलापूर :
बदलापुरात होणाऱ्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या नेत्या ऋता आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कचरा प्रकल्पाच्या टेंडरची होळी करण्यात आली.बदलापूर शहरातील वालीवली येथे बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या तीन शहरांचा मिळून सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बदलापूरमध्ये बाहेरच्या शहरांचा कचरा नको, अशी भूमिका घेत महाविकास आघाडीने या प्रकल्पाला विरोध केला. आज महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी या प्रकल्पाविरोधात निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या ऋता जितेंद्र आव्हाड या उपस्थित होत्या. कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या टेंडरची यावेळी होळी करण्यात आली. तसेच काहीही झाले तरी बाहेरचा कचरा बदलापूर शहरात येऊ देणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी घेतली. तर एखादे शहर मोठं होत असताना, स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प होत असताना फक्त शहरात रंगरंगोटी करून होत नाही, तर कचऱ्यासारख्या प्रश्नावर नियोजनही करावे लागते, असे म्हणत ऋता आव्हाड यांनी या प्रकल्पावर टीका केली. बदलापूर शहरात झालेल्या या आंदोलनाला काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष दामले, कालिदास देशमुख, अविनाश देशमुख, शिवसेना शहरप्रमुख किशोर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि वालीवलीचे ग्रामस्थ उपस्थित होते.