Mahavikas Aghadi Lok Sabha Election ( Marathi News ) :लोकसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाबद्दल खल सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधक या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर मविआ कमजोर झाल्याचं दिसत असलं तरी आगामी निवडणुकीच्या रणांगणात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३४ जागांचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती समोर आली आहे.
'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांच्या नेत्यांच्या मुंबईत झालेल्या दोन बैठकांमध्ये जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतून ३४ जागांबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झालं आहे. मात्र उर्वरित १४ जागा मविआतून कोणते पक्ष लढणार, याबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे.
कोणत्या जागांवर तिढा कायम?
२०१९ साली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचं गणित अद्याप निश्चित झाल्याचं दिसत नाही. ज्या १४ जागांवर अजूनही निर्णय झालेला नाही त्यामध्ये वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी या जागांचा समावेश असल्याची माहिती आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची तिसरी बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. या बैठकीत उर्वरित १४ जागांवरही चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर जो फॉर्म्युला तयार होईल, त्यावर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची मंजुरी घेतली आणि या आठवड्यातच जागावाटपाची घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे.