जळगाव - महायुतीनं ४५ जागा जिंकणार असा दावा केलाय, ३ जागा कुणासाठी सोडल्या माहिती नाही. अलीकडच्या काळात आलेले सर्व्हे पाहिले तर महाविकास आघाडीला जास्त जागा आणि महायुतीला कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यानुसार महाविकास आघाडीला ३५-४० हून अधिक जागा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मिळतील असा दावा शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, रावेर मतदारसंघाची लोकसभा जागा राष्ट्रवादीला मिळावी असा आमचा आग्रह आहे. रावेर मतदारसंघासाठी मी इच्छुक आहे. पक्षानेही मला या जागेसाठी लढण्यास सांगितले आहे. तब्येतीचे कारण आहे. डॉक्टरांची सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ. महाआघाडीच्या माध्यमातून मी या जागेवर लढण्यास इच्छुक आहे. ही जागा आम्ही जिंकून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच जळगाव जिल्ह्यात सर्व विरोधक आणि मी एकटा असे चित्र वारंवार दिसून येतंय. याचा अर्थ नाथाभाऊला विरोध करावा असं सत्ताधारी पक्षाच्या सर्वांना वाटते. नाथाभाऊला व्यक्तिगत विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. शेतकरी आत्महत्या, विकासाच्या दृष्टीने जे प्रश्न आहेत त्यावर अधिक लक्ष घालावे असा टोला एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिला.
दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा नाही. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पुढील १५ दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या या जागांचा निर्णय होईल. जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकावी असा आमचा प्रयत्न आहे.आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. त्यामुळे यात यश मिळावं असा आमचा संकल्प आहे असंही खडसेंनी सांगितले आहे.