मुंबई - भाजप आणि शिवसेना यांच्यातील 30 वर्षांपासूनची मैत्री तुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या शत्रुपक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आता हाच प्रयोग स्थानिक पातळीवर देखील राबविला जाणार आहे.
राज्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यास मोकळीक असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. नागपूर, अकोला, नंदूरबार, धुळे आणि वाशीम येथील जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी 7 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला पाच जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. शक्ती नसेल तिथे शिवसेनेला सोबत घेण्याचे थोरात म्हणाले. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचा पॅटर्न ग्रांमपंचायतीपर्यंत जाणार असं दिसत आहे.