कोल्हापूर : राज्यपालांबाबत घटनेने घालून दिलेल्या प्रथा परंपरा आहेत. मात्र त्या बाजूला ठेवून त्यांच्या विमानप्रवासाला परवानगी टाळून महाविकास आघाडीने सूडभावनेचा परमोच्च बिंदू गाठला असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या दरेकर यांनी गुरूवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. दरेकर म्हणाले, विषय बारा आमदारांच्या नियुक्तीचा असला तरी घटनेने घालून दिलेली प्रक्रिया पार पाडूनच राज्यपालांनी परवानगी दिली असती. परंतू त्यांच्या प्रवासालाच मान्यता न देणे हा अतिरेक आहे.
यातील आपल्याला काही माहिती नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत असतील तर या सरकारमध्ये समन्वय नाही हेच यातून स्पष्ट होते. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष वेगवेगळे निर्णय घेतात हे यााधी स्पष्ट झाले आहे. यावेळी दरेकर यांनी केंद्र सरकारने अथर्संकल्पाामध्ये महाराष्ट्राला ३ लाख ५ हजार ६११ कोटी रूपयांची तरतूद केल्याचे सोदाहरण सांगितले.