मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांनी नगराध्यक्ष निवडीसाठी मोट बांधली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे पत्रक जारी केले आहे. प्रत्येक नगरपंचायतीत आपलेच नगराध्यक्ष निवडून येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन स्थानिक नेत्यांना आणि विजयी सदस्यांना केले आहे.
राज्यात अलीकडे १०६ नगरपंचायतींसह भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद, तसेच १५ नगरपंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याचा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्त पत्रकात केले आहे.
तसेच नगरपंचायत निवडणुकीत मिळालेले हे यश कायम ठेवायचेआहे. त्यासाठी प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होणे अत्यावश्यक आहे. तरी सर्वांनी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करावेत. निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणण्याचे आवाहन पत्रकात केले आहे. त्यामुळे निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांनी नगराध्यक्ष निवडीसाठी आता मोट बांधली आहे.