इचलकरंजी : महावितरण कंपनीच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या विजेच्या दरवाढीचा २६१५ कोटी रुपयांचा फटका वीज ग्राहकांना बसणार आहे. महानिर्मितीकडे असलेल्या औष्णिक केंद्रातील वीज घेतल्यामुळे पाच हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडत आहे. परिणामी, महानिर्मितीकडील वीज खरेदी बंद करावी. तसेच केंद्रीय क्षेत्र व खासगी कंपन्यांकडून मिळणारी स्वस्ताची वीज खरेदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी ऊर्जा आयोगाकडे केली आहे.महानिर्मितीचा अकार्यक्षम कारभार व कोळसा खरेदीमध्ये असलेला भ्रष्टाचार यामुळेच वाढीव उत्पादन खर्च पडत आहे. सन २०१२-१३ मध्ये केंद्रीय क्षेत्राचा सरासरी सौरयंत्र भारांक ७९.१८ होता, तर याच काळात महानिर्मितीचा भारांक ५८.१० होता. सन २०१३-१४ मध्ये केंद्राचा भारांक ७६.१८ इतका, तर महानिर्मितीचा भारांक ५१.७० होता. वीज उत्पादन कमी, तेवढा दर जास्त. त्यामुळेच खासगी आणि सार्वजनिक औष्णिक पुरवठादारापेक्षा महानिर्मितीची औष्णिक वीज सरासरी १ रुपये २५ पैसे प्रतियुनिट दराने महाग पडत आहे. त्याचा दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांचा बोजा राज्यातील वीज ग्राहकांवर पडत आहे.सन २०१२-१३ मध्ये महानिर्मितीने दाखविलेला प्रकल्पनिहाय वीज उत्पादनाचा खर्च प्रतियुनिट पुढीलप्रमाणे : चंद्रपूर - ३ रुपये ०३ पैसे, खापरखेडा - ३.९७ रुपये, परळी - ४.३७ रुपये, पारस - ३.३८ रुपये, भुसावळ - ४.७५ रुपये, कोराडी - ५.१३ रुपये, नाशिक - ५.६२ रुपये. या सर्व उत्पादनाची सरासरी ४.२० रुपये प्रतियुनिट अशी आहे. राष्ट्रीय औष्णिक वीज मंडळाकडील वीज २.४७ रुपये प्रतियुनिट इतकी आहे. याचा अर्थ महानिर्मितीची वीज महाग आहे.तसेच चालू वर्षीसुद्धा सन २०१३-१४ साली महानिर्मितीचा औष्णिक वीज दर सरासरी ४ रुपये २० पैसे प्रतियुनिटपेक्षा अधिक राहील; पण केंद्रीय क्षेत्राचा दर २ रुपये ८० पैसे, जिंदाल ३ रुपये ४९ पैसे, अदानी २ रुपये ५५ पैसे, मुंद्रा २ रुपये ६२ पैसे, इंडिया बुल्स ३ रुपये ३० पैसे, एम्को एनर्जी २ रुपये ९९ पैसे असा आहे. त्यामुळे महावितरणने महानिर्मितीपेक्षा स्वस्त मिळणारी केंद्रीय किंवा खासगी क्षेत्रातील वीज खरेदी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
‘महावितरण’ने केंद्रीय, खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करावी
By admin | Published: December 08, 2014 9:03 PM