अयाज तांबोळी खेड (डेहणे) : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा विभागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याला आधीच शेतकरी वैतागला असताना आता गेली सहा महिने येणारे भरमसाठ वीजबिलामुळे ग्राहक व शेतक-यांचा वाडा अंतर्गत येणाऱ्या ४२ अदिवासी गावांमधील ग्राहकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. भोरगिरी फीडर अंतर्गत साडे तीन हजार ग्राहक असुन निम्मी बिले चुकीची दिली गेली आहेत.
डेहणे येथील एक ग्राहक गंगा केशु भालेराव यांना ११,५२,९४० रुपये बिल आले आहे. त्यांच्या घरात फक्त एकच महिला राहत असून एका महिन्यात एका बल्बसाठी ७१५२७ युनिट वीज वापर दाखवण्यात आला आहे , अशी अनेक बिले ग्राहकांना देण्यात आली आहेत. आदिवासी भागातील बेचाळीस गावे गेली अनेक महिने चुकीच्या बिलांमुळे ञस्त असुन योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी करत असूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. प्रत्येक महिन्याला चुकीच्या रिडींगमुळे येणारे भरमसाठ बिलामुळे व्यावसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय बिल दुरूस्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी राजगुरुनगरला जावे लागत असल्याने आर्थिक नुकसान होत असुन वेळ वाया जात असल्याची आदिवासी भागातील ग्राहक तक्रार करत आहेत. गेली कित्येक महिने वीज रिडींग घेतले जात नाही, खरे तर मीटर रिडींगचे फोटो घेणे आवश्यक आहे. निदान फोटो नाही पण प्रत्येक मीटरचे रीडींग घेतले जावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. दुरूस्तीसाठी बिलापेक्षा जास्तीचा खर्च होत असुन ग्राहकांना आर्थिक नुकसान होत आहे. महावितरण विभागाकडुन रिडींगसाठी कर्मचारी नेमण्याची गरज आहे. ------------ नवीन काम निकृष्ट भोरगिरी फिडरचे कंडक्टर ( वीजवाहिन्या) बदलण्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे, परंतु ११ केव्हीसाठी ३३ केव्ही चे साहित्य वापरणे, चुकीच्या पद्धतीने दिलेला ताण तसेच बदलेले पोल खोलवर नसल्याने पावसाळ्यात अनेक पोल पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वीज जाण्याचा झटका आदिवासी भागातील जनतेला सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी कराव्यात अशा दुरुस्तीच्या कामाचे अद्याप नियोजन नसल्याने वादळ व अल्प प्रमाणात पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित होऊन यंत्रणेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. तसेच ट्री कटींग, रोहित्र , फ्युज, पटट्या बदलणे तसेच किरकोळ दुरुस्ती कामे निघत असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा वीज ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. -----------वाडा विभागासाठी ना अधिकारी ना वायरमन वाडा विभागासाठी सध्या शाखा अभियंता या पदावर कार्यरत अधिकारीच नाही. पूर्वीच्या अधिकारी बदलुन गेल्यावर हंगामी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सांगितले जाते. परंतु, हे अधिकारी कार्यक्षेञात फिरकत नसल्याने रिडींग बरोबर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच भोरगिरी फिडरसाठी पाच वायरमन आवश्यक असताना आव्हाट ते भोरगिरी परिसरातील २७ गावांना एकही वायरमन नाही. विशेष म्हणजे कंत्राटी नेमलेल्या आऊटसोर्सिगच्या कामचलाऊ वायरमनलाही कमी करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या आदिवासी भागातील बेचाळीस गावे रामभरोसे असल्याचे चित्र आहे.