मुंबई : महावितरण कंपनीत फिल्डवर कार्यरत असलेले कर्मचारी हेच महावितरणची खरी संपत्ती असून, त्यांच्या हितास कंपनीने नेहमी प्राधान्य दिले आहे. या कर्मचाऱ्यांमुळेच ग्राहकांना चांगली सेवा पुरवणे शक्य होत असून, याचा सकरात्मक परिणाम महावितरणच्या महसूल वाढीवर होत आहे. त्यामुळेच मागील मार्च महिन्यात महावितरण कंपनीचा महसूल ४ हजार ५०० कोटीपर्यंत पोहोचल्याची माहिती भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी दिली.महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने भांडुप नागरी परिमंडळा अंतर्गत कार्यरत असलेल्या ३९ कर्मचाऱ्यांचा ‘उत्कृष्ट कर्मचारी’ म्हणून सतीश करपे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. प्रत्येक विभागातून एक या प्रमाणे एकूण ९ यंत्रचालक व प्रत्येक उपविभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे ३० तांत्रिक कर्मचारी यांची विविध निकषावर आधारित ही निवड करण्यात आली.सतीश करपे म्हणाले, ‘पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेचा ‘मोबाइल अॅप’ हा भाग असून, या तंत्रज्ञांचा सुयोग्य वापर आपणा सर्वांमुळे शक्य झाला आहे, कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी अधिक सुसंवाद प्रस्थापित केल्यास, त्यांच्या अडचणी सोडवल्या जाऊन, ग्राहकांना वेळेत बिल भरण्याची चांगली सवय लागू शकते, त्याकरिता अधिकारी- कर्मचऱ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.’ (प्रतिनिधी)
महावितरणचा महसूल साडेचार हजार कोटी
By admin | Published: May 02, 2017 5:10 AM