मुंबई - मुंबईसह राज्यभरातून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असतानाच महावितरण स्मार्ट मीटर लावण्यावर ठाम आहे. राज्यभरात २ कोटी ४१ लाख ९२ हजार ३९९ स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्याची कंत्राटे विविध कंपन्यांना देण्यात आली असून, साखरपट्ट्यातील कोल्हापूर, बारामती आणि पुण्यात अदानी समूहाकडून हे मीटर बसविले जाणार आहेत.
गेल्या वर्षभरापासून स्मार्ट मीटरला कडाडून विरोध केला जात आहे. महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेने तर स्मार्ट मीटर विरोधात चळवळ उभी केली आहे. मात्र, वीज कंपन्या स्मार्ट मीटरवर ठाम आहेत. मुंबईत बेस्टतर्फे लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरवर वीज ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक आणि जळगाव विभागामध्ये २८ लाख ८६ हजार ६२२ तर लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर विभागात २७ लाख ७७ हजार ७५९ मीटर लावले जातील. एम/एस मोंटेकार्लोकडून चंद्रपूर, गोंदिया, नागपूर झोनमध्ये ३० लाख अकोला, अमरावती विभागामध्ये २१ लाख स्मार्ट मीटर लावले जातील. एकूण २ कोटी ४१ लाख मीटर लावले जाणार आहेत.
साखरपट्ट्यात अदानीचे मीटर ‘अदानी’कडून मुंबईतील भांडूप, कल्याण विभागात आणि कोकणात ६३ लाख ४४ हजार ६६ हजार मीटर लावले जातील. तर कोल्हापूर येथे १७ लाख ३१ हजार ५३ मीटर लावले जातील. बारामती, पुणे, कोल्हापूर या साखरपट्ट्यात ‘अदानी’कडून ५२ लाख ४५ हजार ९१७ स्मार्ट मीटर लावले जातील. प्राधान्यक्रमानुसार मीटर बसवणार स्मार्ट मीटर बसविण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यानुसार, पहिल्यांदा सर्व फिडरवर २७ हजार ८२६ मीटर लावले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सरकारी कार्यालये आणि वसाहती, उच्च दाबाच्या ग्राहकांसाठी मीटर लावले जातील.