कमलेश वानखेडे,नागपूर Maharashtra Election 2024 Vidarbha : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यात भाजपची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'होम पीच' असलेल्या नागपुरात भाजपने सर्व सहाही जागा जिंकून २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे, तर काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचाही 'जोश हाय' असून, २०१९ मधील दोन चे चार करू, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. भाजपकडून शहरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला जात आहे, तर काँग्रेसची भिस्त सामाजिक समीकरणांवर असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर शहरातील सहाही जागांचा विचार करता थेट भाजपमधून मोठी बंडखोरी झालेली नाही, तर तब्बल चार मतदारसंघांत काँग्रेसच्या बंडखोरांनी दंड थोपटले आहेत.
आभा पांडेंच्या बंडखोरीचा फटका बसण्याची भीती
पूर्व नागपूरची जागा यावेळी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे गेली. शरद पवार यांच्या पसंतीचे उमेदवार असलेले दुनेश्वर पेठे यांचा सामना भाजपचे हेविवेट उमेदवार कृष्णा खोपडे यांच्याशी आहे. पण, येथे अजित पवार गटाच्या आभा पांडे यांच्या बंडखोरीमुळे भाजपला काहीसे नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे गेल्यावेळचे तेली समाजाचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनीही बंडखोरी केली आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजपला बसेल की शरद पवार गटाला याचे मोजमाप सुरू आहे.
नागपूर दक्षिण मतदारसंघात काय?
दक्षिण नागपुरात २०१९ प्रमाणेच भाजपचे मोहन मते व काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात थेट सामना आहे. मते हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जीवलग आहेत, तर गिरीश पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विदर्भातील राईट हॅण्ड समजले जाणारे किरण पांडव यांचे बंधू, त्यामुळे या लढतीत अनेक वाटा व वळणे आहेत.
नागपूर पश्चिममध्ये ठाकरे विरुद्ध कोहळे
लोकसभा निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरी यांना भिडणारे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे पुन्हा एकदा पश्चिम नागपुरात नशीब आजमावत आहेत. भाजपमध्ये उमेदवारीवरून बरेच मंथन झाले. हिंदी भाषिकांचा दावा मोडीत काढत ऐनवेळी नितीन गडकरी यांचे विश्वासू असलेले दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पश्चिममध्ये उतरविण्यात आले.
सुरुवातीच्या नाराजीनंतर आता ठाकरेंना घेरण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. काँग्रेसमधून निलंबित झालेले नरेंद्र जिचकार अपक्ष रिंगणात आहेत. ते भाजप नेत्यांचे 'लाडका भाऊ' बनले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने येथे पक्षाचे अखिल भारतीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांना पुन्हा संधी दिली आहे. २०१४ मध्ये गुडधे यांच्या विरोधात एकतर्फी सामना जिंकला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने ३५ हजारांवर मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे गुडधे ही आघाडी भरून काढतात की फडणवीस एकतर्फी विजयाची पुनरावृत्ती करतात याकडे लक्ष लागले आहे.
मध्य नागपुरात 'हलबा'चा फटका कुणाला ?
मध्य नागपूरमध्ये हलबा समाजाचे प्राबल्य आहे. येथे भाजपने हलबा समाजाचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांचे तिकीट कापून आ. प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने गेल्यावेळी पराभूत झालेले बंटी शेळके यांच्यावरच डाव खेळला आहे. हलबा समाजाने एकत्र येत काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. पुणेकर हे भाजपकडे जाणारे हलबा व काँग्रेस अशी दोघांचीही मते खेचत आहेत. त्यामुळे येथे गेल्यावेळेप्रमाणेच अटीतटीची लढत होईल, असे दिसते.
निवडणुकीतील महत्त्वाचे फॅक्टर
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दारोमदार वंचितच्या कॅडर मतांवर अवलंबून आहे. मध्य नागपुरात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. येथे चार मुस्लीम उमेदवार अपक्ष म्हणून लढत आहेत.
मुस्लीम मतविभाजन मोठ्या प्रमाणात झाले तर काँग्रेसच्या अडचणी वाढतील. उत्तर नागपुरात काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सांगोळे हे पक्षांतर करीत बसपाच्या हत्तीवर स्वार झाले आहेत. येथे हत्ती जोरात धावला तर काँग्रेसला धाप लागू शकते.