मुंबई : महायुतीमध्ये शिवसेनेने २२ आणि राष्ट्रवादीने १६ जागांची मागणी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली असून, आता तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची एन्ट्री होणार आहे. शाह हे ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न कायम असल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही राज्यातील उमेदवारांची यादी तयार करताना अडचणी येत आहेत. अमित शाह ५ व ६ मार्चला होणाऱ्या बैठकांमध्ये भाजप कोणत्या जागा लढवणार याचे स्पष्ट संकेत नेत्यांना देतील असे मानले जाते.
महायुतीत भाजपने किमान ३० ते ३२ जागा लढवाव्यात असे पक्ष नेतृत्वाला वाटते. त्याचवेळी ४८ पैकी ३८ जागा शिवसेना व राष्ट्रवादीने मागितल्याने पेच निर्माण झाला आहे. मित्रपक्षांची मागणी कमी करून ३० ते ३२चा आग्रह मान्य करून घेण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
छत्रपती संभाजीनगर, जळगावमध्ये सभा- अमित शाह सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. ते मंगळवारी अकोला आणि जळगाव येथे लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर बैठका घेतील. - छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडक भाजप नेत्यांशी ते जागांसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. सभेनंतर ते रात्री मुंबईत येतील. - रात्री उशिरा आणि ६ मार्चला मुंबईत ते मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्यांशी चर्चा करतील. - महायुतीतील जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.