सांगलीत परस्पर उमेदवार जाहीर करून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला जसे कोंडीत पकडले तशीच खेळी नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी खेळली आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे महायुतीचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे शांतीगिरी महाराजांनी आज अर्ज भरला आहे. यावर शिंदे शिवसेना असा उल्लेख केल्याने नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पहायला मिळाला आहे.
दिल्लीतून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाला भाजपाच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखविल्याचा दावा भुजबळ यांनी केला होता. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचा रिपोर्ट असल्याने व भाजपासह राष्ट्रवादीचा विरोध असल्याने गोडसे यांना उमेदवारी देणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले आहे. अशातच उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे कारण देत भुजबळांनी आपला दावा मागे घेत दबावाचे राजकारण खेळले होते. अशा या नाशिक मतदारसंघातून शांतीगिरी महाराजांच्या वेगळ्याच खेळीने खळबळ उडाली आहे.
शांतीगिरी महाराजांनी आज गोदा घाट परिसरात असलेल्या गौरी पटांगणात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हजारो भक्त परिवाराच्या उपस्थितीत शांतीगिरी यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख केला आहे. परंतु अर्जासोबत शिवसेनेचा एबी फॉर्म जोडलेला नाहीय.
याबाबत विचारले असता शांतीगिरी महाराजांनी आपण यावर जास्त बोलू शकत नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख केला आहे. आता पक्षाने ठरवायचे आहे. त्यांनी एबी फॉर्म दिला तर ठीक नाहीतर ही निवडणूक मी लढविणार आहेच, असे ते म्हणाले आहेत.
शांतीगिरी महाराजांची प्रतिक्रिया काय?
आमच्या लोकसभेच्या मंडळींनी निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून फॉर्म भरला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमचे सगळे मुद्दे शांततेने ऐकून घेतले आहेत. शिंदे म्हणाले योग्य तो निर्णय घेऊ. प्रभू रामाच्या हातात धनुष्य आहे त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील. आमच्या भक्त परिवाराने परस्पर चर्चा केली आहे त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. एबी फॉर्म आला की आमचे वकील आणि भक्त परिवार निर्णय घेतील, असे महाराजांनी सांगितले आहे.