कोल्हापूर - जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघात महायुतीतील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांनी मित्रपक्ष भाजपा आणि शिंदेसेनेला इशाराच दिला आहे. महायुती अबाधित ठेवायची असेल तर निवडणूक लढवण्याचे मनसुबे आखणाऱ्या नेत्यांना आवार घाला असं विधान आमदार राजेश पाटील यांनी करत विकासाच्या कामावर जनता मला आशीर्वाद देईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
आमदार राजेश पाटील म्हणाले की, विद्यमान आमदारांना त्या त्या मतदारसंघात उमेदवारी दिली जाणार आहे, जो शब्द महायुतीत अजित पवारांना भाजपाने दिलेला आहे, महायुती अबाधित ठेवायची असेल तर तो शब्द ते पाळतील. मित्रपक्ष भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी आपापल्या नेत्यांना सांभाळून, त्यांचे मन परिवर्तन करून महायुतीसोबत ठेवण्याचं कर्तव्य त्यांचे आहे. गोव्याचे भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या पक्षातील उमेदवारांची पाठराखण करणं हे साहजिकच आहे. प्रत्येकाला आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळणे ही भावना असणे स्वाभाविक आहे. परंतु राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचे असेल कुणीतर एक पाऊल पुढे आणि एक पाऊल मागे हटणे ही काळाची गरज आहे, अन्यथा लोकसभेला जे घडलं त्याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. याचा अभ्यास एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना झालेला आहे. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे निवडणुका लढवण्याचे मनसुबे आहेत, स्वप्न पाहिली आहेत त्यांना आवर घालणे त्या त्या पक्षाचे काम आहे. त्यामध्ये ते यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय ज्या व्यक्तीला तालुक्यातील गावांची नावे माहिती नाही त्यांनी दौलत सहकारी साखर कारखान्यावर बोलणे फार चुकीचे आहे. माझ्या वडिलांनी हा कारखाना स्थापन केला. ३० वर्ष तो चांगल्यारितीने चालवला. १९७५ साली शरद पवारांच्या शुभहस्ते पहिला गळीत हंगाम झाला होता. तो कारखाना सहकारातील, शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या माध्यमातील कारखाना आहे. केडीसी बँकेच्या करारातून हा कारखाना त्यांनी चालवायला घेतला आहे. गेली ५ वर्ष जे ग्रहस्थ हा कारखाना चालवत आहेत आज ते सर्वठिकाणी जाहीर करतात मी ५ हजार कोटीच्या कारखान्याचा मालक आहे. केडीसी बँकेचे ६७ कोटी कर्ज फेडलेले आहे. मग मागील ५ वर्ष इथल्या कामगारांची आणि शेतकऱ्यांची ३० कोटींची देणी हे देत नाहीत. हे आता गुडघ्याला बाशिंग बांधून तालुक्यात पैशाचा वापर करत जेवणावळी सुरू केल्यात. ते माझ्यावर टीका करतात, ते किती निंदनीय आहे. कामगार, शेतकऱ्यांची देणी दिल्याशिवाय त्यांना लायसन्स देऊ नये ही आमची मागणी आहे. मी राजेश पाटील आमदार असताना कधी कारखाना बंद पाडला हे सगळ्यांना ज्ञात आहे असा टोला राजेश पाटील यांनी मित्रपक्षातील इच्छुक नेत्यांना नाव न घेता लगावला.
दरम्यान, ज्या मंडळींना या निवडणुकीत उतरायचं असेल त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मी चंदगड मतदारसंघात ५ वर्ष विकासाचं काम केले आहे. त्यामुळे या भागातील मतदार विकासाच्या विचारावर मतदान करतील. ते आमच्या पाठीशी राहतील. महायुतीचा उमेदवार म्हणून भरभक्कमपणे लोक माझ्या पाठीशी राहून यापुढे विकासाचा रथ यापुढे नेण्यासाठी मला आशीर्वाद देतील हा ठाम विश्वास आहे असंही आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.
काय आहे वाद?
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच चंदगडच्या मेळाव्यात राजेश पाटलांविरोधात इच्छुक भाजपा नेते शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले. त्यावरून महायुतीत ठिणगी पडली. चंदगड मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश पाटील असून ते अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे महायुतीकडून राजेश पाटील हे उमेदवारी असतील अशी शक्यता आहे. त्यात भाजपातील इच्छुक निवडणुकीची तयारी करत राजेश पाटलांना आव्हान निर्माण करत आहेत. त्यातूनच हा वाद पेटला आहे.