चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची रचना निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत दाखल झालेत. सहा आमदारांमागे एक मंत्रिपद अशा फॉर्म्युल्यावर गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस बुधवारी पहिल्यांदाच दिल्लीत आलेत. राजधानीत दाखल होताच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भेटीगाठी केल्या. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या भेटी घेतल्या. हे वृत्त देईपर्यंत फडणवीस व अजित पवार यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाली नव्हती.
उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बुधवारच्या सायंकाळी राजधानीत दाखल झाले. अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी त्यांनी नेत्यांशी चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही उपस्थित होते.
एकनाथ शिंदे ठाण्यातफडणवीस आणि अजित पवार दिल्लीत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिवसभर ठाणे मुक्कामी होते. त्यामुळे ते दिल्लीला का गेले नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे सेनेतही संभाव्य मंत्र्यांच्या नावावर अजून एकमत झालेले नाही. तानाजी सावंत, संजय राठोड,अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला काहींचा आक्षेप असल्याचे समजते. अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे किती मंत्री असतील आणि कोणत्या पक्षाला कोणते मंत्रालय दिले जाईल, यावर अंतिम चर्चा होणार आहे.
केंद्रातील एका मंत्रिपदाशिवाय राज्यपाल पदही मिळावे...भाजप आणि अजित पवार गटातील विश्वसनीय सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, सहा आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. मागच्या सरकारमध्ये अजित पवार गटाचे नऊ मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद होते.
हे कायम राहावे, असा अजित पवार यांचा आग्रह आहे. मात्र, मंत्र्यांची संख्या कमी झाल्यास पवार प्लॅन ‘बी’सह सज्ज आहेत. यानुसार, केंद्रातील एका मंत्रिपदाशिवाय अजित पवार गटाची उपस्थिती असलेल्या लहान राज्याचे राज्यपाल पद मिळावे, अशी पवार यांची मागणी आहे. नागालँड किंवा अरुणाचल प्रदेशात अजित पवार गटाचे आमदार आहेत, हे उल्लेखनीय.
शपथविधी कधी होणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत न आल्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शिंदेसेनेला जे हवे आहे ते त्यांना देण्याचा शब्द देण्यात आल्याचे कळते. गृहखात्याचा तिढासुद्धा सुटला आहे. या कारणामुळे शिंदे आले नाही. अजित पवार भेटीसाठी आलेत; कारण त्यांना प्लॅन ‘बी’वर चर्चा करायची होती, असे सूत्राचे म्हणणे आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. गृहमंत्री शाह यांच्यासोबतच्या बुधवारच्या भेटीनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी १४ डिसेंबरला होणे जवळपास निश्चित आहे.