‘लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 09:16 AM2024-07-26T09:16:12+5:302024-07-26T09:17:28+5:30

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आता महायुती सरकारकडून तीन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mahayuti government decision to increase the scope of Mukhyamantri Annapurna Yojana | ‘लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु

‘लाडक्या बहिणीं’ना आता सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु

Mukhyamantri Annapurna Yojana :महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांसाठी  ही योजना लागू असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या  उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे महिन्याला १५०० रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मिळणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून त्याचा शासकीय आदेश काढला जाणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांकडून ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ची घोषणा करण्यात आली होती. महिलांच्या आरोगांच्या तक्रारी कमी करायच्या दृष्टीने ही योजना राबण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं होतं. योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील ५६ लाख हून अधिक कुटुंबाना होणार आहे. अल्प उत्पन्नगट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना हा लाभ मिळणार आहे. तीन सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

केंद्र सरकार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना  एका गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये अनुदान देते. एका गॅस सिलिंडरची सरासरी किंमत ८३० रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर ५३० रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारला लाभ मिळणार नाही. त्यामुळे यासंदर्भात राज्याची स्वतंत्र योजना राबवली जावी अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही सरसकट अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कटुंबात एका रेशनकार्डवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलिंडर दिला जाणार आहे. गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे सरकारवर वर्षाला चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे. 

विधानसभेच्या चाचणी परीक्षेसाठी लाडकी बहीण; नीलम गोऱ्हेंची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना विधानसभा निवडणुकीची चाचणी परीक्षा सोडविण्याचा हा एक भाग आहे यात शंकाच नाही पण, विधानसभा निवडणुकीचा मुख्य उद्देश नाही. चाचपणीसाठी पक्षाच्या विविध यंत्रणा कार्यान्वित आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
 

Web Title: Mahayuti government decision to increase the scope of Mukhyamantri Annapurna Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.