महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवलीय, हिशोब चुकता करावा लागेल, विजय वडेट्टीवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 06:44 PM2024-08-09T18:44:59+5:302024-08-09T18:46:03+5:30
Vijay Wadettiwar : आता महाराष्ट्राच्या लढाईसाठी आपल्याला तयार व्हावे लागेल. पुढची लढाई 'करो किंवा मरो'ची आहे. महाराष्ट्र वाचविण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, असंही विजय वडेट्टीवार सांगितलं.
Vijay Wadettiwar : मुंबई : महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवली आहे. त्यामुळं महायुतीचा हिशोब चुकता करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. महात्मा गांधी यांच्या ऑगस्ट क्रांतीला ८२ वर्षे होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसनं मुंबईत कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळं आपल्याला सावध राहिले पाहिजं. इंग्रजांविरोधात बंड पुकारताना महात्मा गांधींनी 'चले जाव'चा नारा दिला होता. आता महायुती सरकारविरोधात 'चले जाव'चा नारा द्यावा लागणार आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण केलं जात आहे. त्यामुळं आपल्याला सावध राहिले पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करून महायुती सरकारला मतं मिळत नाही म्हणून हे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळं पुढचे दोन अडीच महिने दक्ष राहून या प्रवृत्तीविरोधात लढावं लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
महात्मा गांधी यांनी 'करो या मरो' असा नारा दिला. इंग्रजांचे सोबती आता सत्तेत आहेत आणि तेच आता देशभक्ती सांगत आहेत. महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवली आहे. त्यामुळं महायुतीचा हिशोब चुकता करावा लागेल, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.
याचबरोबर, राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांना भीती वाटते. राहुल गांधी या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत. ही लढाई आपल्याला पुढे न्यावी लागणार आहे. आता महाराष्ट्राच्या लढाईसाठी आपल्याला तयार व्हावे लागेल. पुढची लढाई 'करो किंवा मरो'ची आहे. महाराष्ट्र वाचविण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, असंही विजय वडेट्टीवार सांगितलं.