लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत शिंदेंना भाजपाच्या विरोधामुळे उमेदवार बदलावे लागले होते. यामुळे महायुतीतभाजपाची ताकद किती जास्त आहे हे एव्हाना सर्वांनाच समजून चुकले असेल. जागा शिवसेनेची, खासदार शिवसेनेचा तरीही उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून वाकडी वाट करून ठाण्याच्या शिंदेंकडे आलेल्या सात खासदारांचा यंदा भाजपामुळेच पत्ता कापला गेला आहे. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद आहे. लोकसभेला एवढे मग विधानसभेला काय, अशा विवंचनेत असताना आमदारांना अडचणीत आणणारी अटच भाजपाने ठेवली आहे.
भाजपाला काहीही करून महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्या आहेत. यामुळे सगळे रुसवे फुगवे विसरून आमदारांनी कामाला लागावे यासाठी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात लीड द्यावे अन्यथा तिकीट नाही अशी तंबीच सर्वांना दिली आहे. लोकसभेला दिलेला उमेदवार आवडीचा असो की नावडीचा त्याला लीड दिले तरच तिकीट नाहीतर आमदारकी धोक्यात अशी परिस्थिती येणार असल्याने या आमदारांनाही पायाला भिंगरी बांधून पळावे लागणार आहे.
या सूचना केवळ आमदारांनाच नाहीत तर इच्छुकांनाही देण्यात आल्या आहेत. ज्या खासदारांची कामगिरी चांगली नाही त्यांचे तिकीट भाजपाने कापले आहे. यात शिंदेंच्या शिवसेनेचाही समावेश आहे. जर भाजप शिंदेंना त्यांची साथ देणाऱ्या खासदारांचे तिकीट कापण्यास भाग पाडू शकतो तर मग आमदारांचे का नाही? आमदारांनीच उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने शिंदे सत्तेत येऊ शकले, शिवसेना पक्ष ताब्यात घेऊ शकले, धनुष्यबाण मिळवू शकले. परंतु, एन विधानसभेला असाच विश्वासघात झाला तर काय, असाही प्रश्न या आमदारांसमोर उभा ठाकलेला आहे.