झुंज अटीतटीची! मराठवाड्यात महायुतीला फटका, मविआला फायदा, पण...; काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:09 AM2024-11-11T10:09:30+5:302024-11-11T10:51:07+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे, त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. त्यातच मनसे, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी या छोट्या पक्षांसह शेकडो अपक्ष रिंगणात उतरल्याने विधानसभा निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. मात्र अद्याप राज्यातील निवडणुकीचा कल दर्शवणारे आकडे आपसे समोर आले नव्हते. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आएएनएस आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
आएएनएस आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला मतदान झाल्यास त्यामध्ये महायुती बाजी मारू शकते. महायुतीला महाराष्ट्रामध्ये १४५ ते १६५ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागण्याची शक्यता ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. या ओपिनियन पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात १०६ ते १२६ जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास महायुतीली ४७ टक्के तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मतं मिळलीत. इतर छोट्या पक्षांना १२ टक्के मतं मिळू शकतात. मात्र महाराष्ट्रातील सर्व छोटे पक्ष आणि अपक्षांना केवळ ५ च्या आसपास जागा मिळतील, असाही दावा या सर्व्हेमध्ये केला आहे.
या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा विभागवार अंदाजही जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ३१ ते ३८ जागा, तर महाविकास आघाडीला २९ ते ३२ जागा मिळू शकतात. विदर्भात महायुतीला ३२ ते ३७ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला २१ ते २६ जागांवर समाधान मानावं लाहू शकतं मराठवाड्यात महायुतीला १८ ते २४ जागा, तर महाविकास आघाडीला २० ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे. कोकणात महायुतीला २३ ते २५ तर महाविकास आघाडीला १० ते ११ जागा मिळू शकतात. मुंबईत महायुतीला २१ ते २६ आणि महाविकास आघाडीला १६ ते १९ जागा मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्रात १४ ते १६ जागांवर महायुती विजयी होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १६ ते १९ जागा मिळू शकतात, असे या पोलमध्ये म्हटले आहे.