Maharashtra Vidhan Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडूनच केला जातो. त्यासाठी निवडणुकीच्या आधी अंतर्गत सर्व्हे सुरू असतात. अशातच सत्ताधारी भाजपनेही आपला बालेकिल्ला असलेल्या विदर्भात सर्व्हे केला असून त्यातून महायुतीसाठी चिंताजनक आकडेवारी समोर आल्याची माहिती आहे. विदर्भातमहायुतीला केवळ २५ जागा मिळतील, असं या सर्व्हेतून समोर आल्याचे समजते.
राज्यात २०१४ साली भाजपची सत्ता आणण्यात विदर्भाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र याच विदर्भात आता भाजपची पीछेहाट सुरू झाली असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही विदर्भात महायुतीसाठी अनुकूल वातावरण नसल्याचं दिसत आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतूनच ही बाब उघड झाली आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
या वृत्तानुसार, विदर्भात भाजपला १८, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळू शकतात, असं भाजपच्या सर्व्हेत समोर आलं आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही चिंतेची बाब ठरणार आहे.
जागांचा तिढा सोडवण्याची कसरत
महायुतीत अजित पवार गटाच्या आमदारांना ‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार पुन्हा उमेदवारी मिळाली, तर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीविरुद्ध लढणाऱ्या भाजपची किमान २० मतदारसंघांमध्ये पंचाईत होणार आहे. नव्या मित्रास जागा देताना आपल्यांच्या समजूतीसाठी भाजपला कसरत करावी लागेल. राज्यात २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आला. आता त्यांच्या आमदारांना पुन्हा संधी द्यायची, तर आपले त्यावेळचे उमेदवार, मेहनत करणारे नेते, कार्यकर्ते यांची मने आणि मते अजित पवार गटाकडे वळविण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.
अजित पवारांशी झालेली युती दुर्दैवी आहे आणि त्यांना सोबत ठेवले, तर विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल, असे विधान भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मध्यंतरी केले होते. अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपचा परंपरागत मतदार नाराज असल्याची चर्चाही सातत्याने होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली, तर जवळपास २० मतदारसंघांत भाजपमध्ये बंड वा नाराजीची शक्यता वर्तविली जाते.