ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - काँग्रेस व राष्ट्रवादी यांना सत्तेवरून खाली खेचायचं असेल तर २५ वर्षांची युती तोडता येणार नाही यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं. आज संध्याकाळी आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते ओम माथूर यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काहीही झालं तरी महायुती तुटणार नाही असे बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
जागावाटपाबाबत आज रात्री आणखी एक बैठक होईल आणि अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेतला जाईल असे देसाई व आदित्य यांनी सांगितले. चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेना व भाजपा या दोघांनी समजंसपणाची भूमिका घेतल्याचे ठाकरे व देसाई यांनी सांगितले.
राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असे आश्वासन भाजपानं दिलं असेल तर भाजपासाठी काही जागा शिवसेना सोडेल असा अंदाज आहे. त्यामुळे आज रात्री महायुतीचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल अशा स्वरुपाचं आश्वासन भाजपा देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याआधी दिवसभरात झालेल्या घडामोडी खालीलप्रमाणे...
आघाडी मुक्त महाराष्ट्रासाठी शिवसेना - भाजप युती तुटू नये असे आम्हालाही वाटत आहे. मात्र ११९ जागा देण्याचा फॉर्म्यूला आता जुना झाला असून ज्या जागांवर शिवसेनेला आजपर्यंत कधीच विजय मिळालेला नाही त्या जागा भाजपला देण्यावर विचार व्हायलाच हवा अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली होती.
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन शिवसेना - भाजपमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला व भाजप जास्त जागांवर ठाम. तर शिवसेनेना याला नकार दिला. त्यामुळे युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महायुती तुटू नये हीच आमची इच्छा आहे. सन्मान आणि समाधान हे दोन केंद्रबिंदू ठेवून दोन्ही पक्षांनी नव्याने चर्चेला सुरुवात केली पाहिजे. शिवसेनेकडे नवीन प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
एनडीएतील घटकपक्ष असूनही शिवसेनेने अनेकदा विरोधी भूमिका घेतली आहे. शरद पवार पंतप्रधान झाल्यास त्यांना पाठिंबा देऊ असे शिवसेनेने म्हटले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना समर्थन दिले होते. मात्र त्यावेळीही भाजपने सामंजस्याची भूमिका घेत युती कायम ठेवण्यावर भर दिला अशी आठवणही मुनगंटीवार यांनी करुन दिली.
विधानसभेतील ५९ जागांवर शिवसेनेला कधीच विजय मिळवता आलेला नाही. या जागा आघाडीला न देता त्या जागा भाजपला देण्यावर शिवसेनेने विचार करायला पाहिजे असे मुनगंटीवार यांनी सांगितले. तर एकनाथ खडसे म्हणाले, २५ वर्षांपूर्वी युती झाली. त्यावेळी लोकसभेत भाजप ३२ तर शिवसेना १६ जागा लढवायची. पण आता शिवसेनेला सहा जागा जास्त देण्यात आल्या आहेत. तसेच आरपीआय नेते रामदास आठवले यांनाही भाजपच्याच जागेवरुन राज्यसभेत पाठवण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी निंदर्शनास आणून दिले.