आज राज्यातील २३०० हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या लागलेल्या निकालामध्ये सत्ताधारी महायुतीने दणदणीत यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपा पहिल्या, अजितदादा गट दुसऱ्या तर शिवसेना शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तिन्ही पक्षांनी मिळून १२७७ हून अधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले असून, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीला मोठ्या प्रमाणावर कौल दिलेला आहे. त्यासाठी मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. महायुती सरकारने गेल्या वर्षभरामध्ये जे काम केलं आहे. तसेच आधीच्या काळात थांबवलेल्या कामांना चालना देण्याचं काम आम्ही केलं आहे. या राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचं धोरण आम्ही आखलं आहे. राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योजक, महिला या सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं आहे आणि खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी पोहोचलं आहे. आता मतदारांनी मतांमधून आमच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा कितीतरी अधिक पटीनं सरपंच आणि सदस्य हे महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो. तसेच मी मुख्यमंत्री म्हणून तसेच सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि मंत्री सर्वजण मिळून राज्यात लोकाभिमुख आणि जनतेला न्याय देण्याचं काम करत राहू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आजच्या निकालांमधून सर्व समाजाने आम्हाला पाठबळ दिलंय, आशिर्वाद दिला आहे, हे दिसून आलं आहे. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी दाखवून दिलं, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच आम्ही कामाचा वेग वाढवलाय. आमची अशीच घोडदौड सुरु राहील. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीचं यश कायम राहील. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ४५ हून अधिक जागा राज्यातून आम्ही देऊ आणि मोदी साहेबांचे हात बळकट करू, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.