शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गायकवाड यांचे समर्थन करत नाही. पण आरक्षणाचे खरे मारेकरी हे काँग्रेस आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच महायुतीतील ८०-९० जागा लढविणार असा जागावाटपाचा फॉर्म्युलाच संपला असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.
आम्ही आरक्षण रद्द करू असे राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढीच्या जे पोटात होते ते आज त्यांच्या ओठात आले. NDA सरकार संविधान बदलणार असे वक्तव्य करत होते. खरंतर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. खऱ्या आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेस आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन करायचे आहे. या नेत्यांनी ८० नाही ९० नाही कुठलाही आकड्यावर न जाता जिथे अजित पवार जिंकतील तिथे अजित पवार लढतील, जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तिथे त्यांचा आग्रह, जिथे आमचे उमेदवार तेथे आमचा आग्रह मान्य केले जाणार आहे. फक्त निवडून येणारे उमेदवार देऊ, हा महायुतीचा आग्रह असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
तसेच काँग्रेसचा मुस्लिम आमदार फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्यावरूनही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणपती दर्शनासाठी अमिन पटेल गेले होते, यात नवीन आणि राजकारणासारखा काही मुद्दा नसल्याचे ते म्हणाले.
जागावाटपावर लवकरच घोषणा...
महायुतीत ७० टक्के जागांवर एकमत झालेले आहे. तिन्ही नेते पत्रकार परिषद घेतील. महाविकास आघाडी पूर्वी महायुतीचा फार्मूला आपल्या सर्वांना दिसेल असा दावा करतानाच सर्व्हेबाबतची अनौपचारिक चर्चा आपल्याला माहिती नाही असे सांगितले.