ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - पायाभूत सुविधा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे रिजन्सी समूहाचे संस्थापक, अध्यक्ष महेश अग्रवाल यांचा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, गृह राज्यमंत्री राम शिंदे आणि सुधीर कुमार यांच्या हस्ते अग्रवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इंफ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधा विभागात महेश अग्रवाल यांच्यासोबत जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडचे रवींदर सिंग बिंद्रा, सचिन कुलकर्णी आणि अशोक कटारिया यांचाही नामांकन यादीत समावेश होता. मात्र महेश अग्रवाल यांनी बाजी मारली आहे. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे.
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
महेश अग्रवाल, रिजन्सी समूहाचे संस्थापक, अध्यक्ष यांची माहिती -
गेल्या अनेक वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील प्रसिद्ध समूहाचे यशस्वी नेतृत्व. अवघ्या २० प्रकल्पांमध्ये सात हजारांहून अधिक घरांची निर्मिती या समूहाने केली असून, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती संकल्पनेसाठी हा समूह ओळखला जातो. गेल्या पंधरा वर्षांत जवळपास २० प्रकल्पांमध्ये ८० लाख चौरस फुटांचे बांधकाम केले आहे. शिवाय, ७ हजार ५०० घरांचे बांधकाम केले आहे. त्याचप्रमाणे, ५ हजारांहून अधिक कुटुंबांना घरे ताब्यात दिली आहेत. या समूहाचे ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली आणि पुण्यात विविध प्रकल्प सुरू असून, सामान्यांच्या मनात या समूहाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सर्व प्रकल्पांमध्ये अचूकता आणि दर्जा ही या समूहाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. रिजन्सी समूहाने आतापर्यंत रिजन्सी इस्टेट, रिजन्सी गार्डन, रिजन्सी टॉवर्स, रिजन्सी मेडोस, रिजन्सी रोझलँड यांसारखे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत, तर भविष्यात पुणे, खोपोली, पनवेल, उल्हासनगर, खारघर, डोंबिवली येथे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सामाजिक भान राखत, या समूहाने एम.एस खैरारी चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब, राजस्थानी विद्यार्थी गृह, आदर्श विद्यामंदिर, कोर्णाक फाउंडेशन, डी.जी.खेतान इंटरनॅशनल स्कूल अशा विविध माध्यमांतून आपले कार्य सुरू ठेवले आहे. सध्या या समूहाचे टिटवाळा, ठाणे, लोणावळा, खारघर आणि पाम बीच येथे प्रकल्प सुरू आहेत. महेश अग्रवाल यांनी टिंबर व्यवसायापासून हा समूहाची सुरुवात केली खरी, पण आज या समूहाचे नाव इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते.
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा