मुंबई - शिवसेनेची भाजपसोबतची युती पक्षाच्या हितासाठी नैतिक आणि तात्त्विक फायद्याची होती. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची महाविकास आघाडी ही बेकायदा व मतदारांचा विश्वासघात करणारी होती, असे एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांचे म्हणणे होते. त्यामुळे त्या आमदारांनी चुकीचे केले नाही, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी बुधवारी केला.
आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. ठाकरे गटाचा ठराव, बैठकीची नोटीस बोगस असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यानंतर जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्राबाबत प्रश्न विचारत सुनील प्रभू यांना उलटतपासणीत भंडावून सोडले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती मतदारांचा विश्वासघात करणारी होती. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांना शिवसेनेच्या संघटनात्मक पदावरून काढून टाकण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नव्हता असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. हा दावा खोटा असल्याचे प्रभू म्हणाले.
सुनील प्रभूंनी साक्ष बदलली२२ जून २०२२ रोजीचे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले, या प्रश्नावर एक - दीड वर्षापूर्वीचे मला आठवत नाही, पण व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून दिले, असे उत्तर प्रभू यांनी दिले. व्हॉटस्ॲप मेसेज सादर करू शकता का, या प्रश्नावर नेमके सांगू शकत नाही, उद्या सादर करण्यासाठी प्रयत्न करतो असे उत्तर प्रभू यांनी दिले.
‘कायदेशीर पेच निर्माण हाेऊ नये म्हणून इंग्रजीत पत्र’तुम्ही हे पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे का? त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत सांगितला का? असा प्रश्न जेठमलानी यांनी केला त्यावर हो असे उत्तर प्रभू यांनी दिले. हे पत्र इंग्रजीत का लिहिले, या प्रश्नावर भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून इंग्रजीत लिहिल्याचे प्रभू यांनी सांगताच कायदेशीर पेच उद्भवू शकतो असे का वाटले, असे जेठमलानी यांनी विचारले.