पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याचे कारण पुढे आले असले, तरी ही भेट भाजपाप्रवेशाची नांदी मानली जात आहे. महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी महेश लांडगे यांच्यासाठी भाजपाचे दार खुले केले आहे. महेश लांडगे यांची समर्थक नगरसेवकांसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत सुमारे दीड तास चर्चा झाली. विशेष म्हणजे लांडगे यांच्याबरोबर मुख्यमंत्री भेटीस गेलेल्या समर्थकांमध्ये भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसे अशा विविध पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी होते. त्यामध्ये माजी उपमहापौर सुदाम लांडगे, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, माजी नगरसेवक बबन बोराटे, राष्ट्रवादीशी संलग्न नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर, मनसेचे राहुल जाधव, मंगेश खांडेकर, काँग्रेसचे जालिंदर शिंदे, राष्ट्रवादीचे शांताराम भालेकर, नितीन काळजे, शिवसेनेचे अजय सायकर, प्रवीण भालेकर, जितेंद्र पवार, विजय फुगे, माजी नगरसेविका अलका यादव, मनसेचे मनोज साळुंखे, अमृत सोनवणे आदींचा समावेश होता.आमदार लांडगे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात, तर त्यांच्या समर्थकांचा पक्ष प्रवेश भोसरीतील जाहीर मेळाव्यात होणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भोसरी मतदारसंघातून भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची अट मुख्यमंत्री फडणवीस यांनी लांडगे यांना घातली आहे. (प्रतिनिधी)
महेश लांडगे यांचे भाजप प्रवेशाचे संकेत?
By admin | Published: September 09, 2016 1:21 AM