ऑनलाइन लोकमत/सुधीर राणे
कणकवली, दि. 22 - प्रत्येक माणसाने खेळ हा खेळलाच पाहिजे. बुद्धीसोबत शरीर मजबूत राहणेही तितकेच गरजेचे आहे. खेळाचा त्यासाठी निश्चितच उपयोग होतो. त्यामुळे या स्पर्धेत खिलाडूवृत्तीने खेळ करा आणि सर्वाना आनंद द्या, असे आवाहन सिने दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी येथे केले.बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने येथील मुडेश्वर मैदानावर आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेता आकाश ठोसर, बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा युवा नेते संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, सुमेधा अंधारी, नीलम पालव, महेश सावंत, संतोष पुजारी, गौरव हर्णे, आदित्य सापळे, चेतन मुंज, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश गवस, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, विजय नेमळेकर, दीपक सांडव, महेश पटेल, अभिजीत शेलार आदी उपस्थित होते.महेश मांजरेकर म्हणाले, मी कोकणातला आहे. माझे गाव जैतापूर हे आहे. त्यामुळे कोकण माझ्या आवडीचा आहे. येथे येण्याची संधी मी कधी सोडत नाही. क्रिकेट हा खेळ मला आवडतो. पुढच्या वर्षी संधी मिळाल्यास या स्पर्धेत माझा संघ मी निश्चितच खेळवीन आणि विजयी देखील होईन. या स्पर्धेचा चषक खूप मोठा आहे. विजयी संघाचा कप्तान या चषकात बसून घरी जातो का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संदेश पारकर म्हणाले, क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात व्हावा तसेच महाराष्ट्रासहित गोवा आणि कर्नाटक राज्यांतील दिग्गज खेळाडूंचा खेळ येथील क्रीड़ा रसिकांना पाहता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिक्रेट रसिकांना गेली २८ वर्षे दर्जेदार खेळ पहाण्याची पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळत आहे. क्रीडा, राजकीय आणि मनोरंजन क्षेत्राचा त्रिवेणी संगम व्हावा हा उद्देश या स्पर्धा आयोजन करताना समोर ठेवला जात आहे. या पर्यटन जिल्ह्यात विविध कलावंत यावेत तसेच त्यानी आपल्या कार्यक्षेत्रात मिळविलेल्या यशापासून प्रेरणा घेऊन येथील तरुणानी मार्गक्रमण करावे.हाही उद्देश आहे.असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले. तुमचे प्रेम लक्षात राहील !तुम्हाला भेटून फार आनंद झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने येथे उपस्थित राहण्याचा योग आला. त्याचबरोबर कणकवलीवासीयांचे प्रेम मिळाले. हे प्रेम माझ्या कायम लक्षात राहील.असे अभिनेता आकाश ठोसर याने यावेळी सांगितले. यावेळी आकाशने 'सैराट' चित्रपटातील संवाद सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.कणकवली शहरात भव्य रॅली !'सैराट' चित्रपटातील ' परशा ' म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर तसेच सिने दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कणकवली शहरातून क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत दुचाकीसह अनेक तरुण सहभागी झाले होते.यानिमित्ताने 'झिंगाट' गाण्याच्या तालावर कणकवलीतील युवाई सैराट झाल्याचे दिसून येत होती. या रॅलीची मुडेश्वर मैदानावर सांगता झाली. रॅलीदरम्यान 'परशा..परशा...' तसेच 'आर्ची आली रे ... ' म्हणत आकाश ठोसरचे कणकवलीकरांनी उत्साहात स्वागत केले.तर परशाची छबी आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती.कणकवली शहरातून बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे औचित्य साधून रविवारी रॅली काढण्यात आली. दुसऱ्या छायाचित्रात कणकवली मुडेश्वर मैदानावरील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सिने-अभिनेते महेश मांजरेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभिनेता आकाश ठोसर, संदेश पारकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.