पुणे : समृद्ध जीवन कंपनीचा संचालक महेश मोतेवार याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ओडिशा पोलिसांकडून वर्ग करून घेण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी ही परवानगी दिली असून, ट्रान्सफर वॉरंट बजावले आहे. महेश मोतेवार याच्यावर महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण (एमपीआयडी) या कायद्यानुसार चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एका महिलेने न्यायालयात केलेल्या खासगी (१५६(३)) तक्रारीनंतर फसवणूक आणि अपहारप्रकरणी २०१४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानाबाद पोलिसांनी मोतेवार याला २७ डिसेंबर रोजी पुण्यात ताब्यात घेत अटक केली. तेथील न्यायालयाने पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्याला ओडिशा पोलिसांनी अटक केली. ओडिशातील अंगुल जिल्ह्यातील तालचेर पोलीस ठाण्यात मोतेवार याच्यावर २०१३ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीसह प्राईज चिट मनी सर्क्युलेशन स्कीम बॅनिंग अॅक्ट १९७८ अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे.
महेश मोतेवारला सीआयडी घेणार ताब्यात
By admin | Published: January 19, 2016 1:54 AM