मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील एन्ट्रीने माहिम हा मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट असा मतदारसंघ बनला आहे. आजवर एकच निवडणूक हरलेले सदा सरवणकर यांच्याविरोधात अमित ठाकरेंना उभे करण्यात आले आहे. अद्याप उद्धव ठाकरेंकडून कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप समजलेले नसले तरी शिवसेनेचेच सर्व शिलेदार एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत.
सदा सरवणकर हे एकेकाळी शिवसेनेतच होते. नगरसेवक ते आमदारकी त्यांनी या काळात भुषविली आहे. २००९ मध्ये ते काँग्रेसवासी झाले. काँग्रेसमधून ते पुन्हा शिवसेनेत येत आमदार झाले. आता ते शिंदे गटात आहेत व २०२४ ची विधानसभा लढवत आहेत. आता राज ठाकरेंच्या मुलासाठी सरवणकर आणि एकनाथ शिंदे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदा सरवणकर यांना शिंदे शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. राज ठाकरेंनी मुंबईतील बहुतांश मतदारसंघांत उमेदवार जाहीर केलेले आहेत. सर्वांच्याच अस्तित्वाच प्रश्न असल्याने यंदाची निवडणूक कोणासाठीच फ्रेंडली फाईट नसणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेतून अमित ठाकरेंना यंदा 'पास'चा सिग्नल दिला जाण्याची चर्चा आहे. २०१९ मध्ये राज ठाकरेंनी मनसे आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली होती. परंतू, यंदा त्यांनी वरळीत संदीप देशपांडेंना उतरविले आहे.
उद्धव ठाकरेंना परतफेडीची संधी...उद्धव ठाकरेंना २०१९ च्या परतफेडीची संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेच मुख्य टार्गेट असण्याची शक्यता आहे. लोकसभेला बिनशर्त पाठिंब्यामुळे राज ठाकरेंनी भाजपाच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांचा खुला प्रचार केला होता. याचा फायदा शिंदे सेनेलाही झाला होता. मनसेची कुमक शिंदे सेनेच्या कामी आली होती. आता शिंदे किमान एका मतदारसंघासाठी तरी या उपकारांची जाण ठेवणार का, सरवणकरांना उमेदवारी मागे घ्यायला लावणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.