वाकोद (जि.जळगाव): निसर्गकवी ना. धों. महानोर यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पळासखेडे (जि.औरंगाबाद) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मान्यवरांची मांदियाळी शुक्रवारी सायंकाळी जमली होती. दोघा सुहृदांच्या या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विशेष म्हणजे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह महानोर यांच्यावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण राज्यातील रसिकवर्ग अमृत महोत्सवाचा साक्षीदार होता. महानोर यांना भलामोठा पुष्पगुच्छ आणि सुलोचना महानोर यांच्यासाठी प्रतिभा पवार यांनी दिलेली भेटवस्तू पवार यांनी देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, ना. धों. महानोर आणि माझे घनिष्ट कौटुंबिक संबंध असून, ते माझ्याकडे नेहमी येतात. मला नेहमी येणे शक्य नसल्याने आज अचानक येऊन भेट देण्याचे ठरविले. बुद्धीमत्तेमुळे त्यांना विधानभवनात संधी दिली, त्यांनी या संधीचे सोने करीत दोन तपे गाजविली. शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आपल्या कल्पकतेने शासनाकडे मांडून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे कार्य केले. विधीमंडळात प्रश्न मांडण्यासाठी उभे राहत तेव्हा माझ्यासह संपूर्ण विधीमंडळ असो की विरोधक सर्वच आवर्जून उपस्थित रहायचे. महानोरांकडून काही नवीन शिकायला मिळेल हाच हेतू त्यात असे. पाणी अडवा-पाणी जिरवासह जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण कामांना महानोरांमुळे गती मिळाली. महानोर यांना पळासखेडे या गावी भेटण्यासाठी येत असताना वाटेत वाकोद गावात आमचे मित्र व शेतकऱ्यांचे कैवारी पद्मश्री भंवरलाल जैन यांची आवर्जून आठवण झाली. ते नसल्याची खंत पवार यांनी बोलून दाखविली. त्यानंतर महानोर लिखित ‘विधिमंडळातून’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांनी केले.