ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - जेट एअरवेजच्या मुंबई-नागपूर विमानात दोन हवाई सुंदरींचा विनयभंग झाल्याची घटना शनिवारी घडली. मद्याच्या अंमलाखाली असलेल्या आकाश गुप्ता या प्रवाशाने हे कृत्य केले. दोन्ही हवाई सुंदरींनी लिखितमध्ये आकाश विरोधात विमानाच्या कॅप्टनकडे तक्रार नोंदवली.
कॅप्टन गोपलसिंग मोहन सिंह याने विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआयएसएफला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आकाश गुप्ताला सीआयएसएफने ताब्यात घेतले. 354 कलमातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आकाशला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
आकाश गुप्ता सुट्टीमध्ये मौज करण्यासाठी गोव्याला गेला होता. परतीच्या प्रवासात त्याने मुंबईहून नागपूरचे विमान पकडले. आकाश गुप्ताने विनयभंग केला तेव्हा तो मद्याच्या नशेत होता असे पोलिसांनी सांगितले. हवाईसुंदरींनी आकाशसाठी जेवणाचे ताट आणले तेव्हा त्याने हवाईसुंदरींचा हात पकडला. त्यांनी लगेच अन्य क्रू सदस्यांना माहिती दिली. क्रू सदस्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आकाशने उलटा त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण कॅप्टनकडे गेले.