चिखलगाव/सायखेड(जि.अकोला): छेडखानीला कंटाळून एका युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी बाश्रीटाकळी तालुक्यातील जलालाबाद येथे उजेडात आली. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी छेड काढणार्या युवकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. जलालाबाद येथील सदर युवती २ किलोमीटरवर असलेल्या चिखलगाव येथील शाळेत इयत्ता १0 वीत शिकत होती. काही दिवसांपासून तिची गावातील तीन युवक छेड काढत होते. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर हा त्रास असह्य झाला. अखेर तिने छेडखानीला कंटाळून शनिवारी रात्री उशिरा गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच बाश्रीटाकळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. दुपारी युवतीवर शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. *युवतीच्या वडिलांनी काढली होती टवाळखोरांची समजूत मुलीची छेडखानी होत असल्याची कुणकुण तिच्या कुटुंबीयांना लागली होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी आठ दिवसांपूर्वीच टवाळखोर युवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या युवकांनीच मुलीच्या वडिलांशी वाद घातला होता.
*हिवरखेड येथील घटनेची पुनरावृत्ती
हिवरखेड येथेही एका विद्यार्थिनीने छेडखानीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नंतर तेल्हार्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. एकूणच ग्रामीण भागात मुलींच्या छेडखानीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना करण्याची मागणी जलालाबाद येथील घटनेच्यानिमित्ताने ग्रामस्थांमधून होत आहे.