ऑनलाइन लोकमतपंढरपूर दि. 3 - विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरुवात झाली आहे. हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र देशात अव्वल असून, शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. स्वच्छता दिंडी 2017चा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्त येथील पंचायत समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छता दिंडीचा गेल्या बारा वर्षांपासून सुंदर उपक्रम सुरू आहे. या दिंडीच्या माध्यमातून राज्यभरातील वारकऱ्यांच्यात जनजागृती होते. या स्वच्छता दिंडीत सहभागी असणाऱ्या कलाकारांचे काम प्रभावी आहे. दिंडीचा उपक्रम स्तुत्य असून याची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून गावोगावी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जावेत. पंढरपूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याचा विशेष आनंद आहे. निर्मलता आणि स्वच्छतेच्या ठिकाणीच ईश्वराचा वास असतो. त्यामुळे स्वच्छतेचे काम महत्वाचे आहे. भविष्यात पालखी सोहळ्यातील विसाव्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभारण्याचा सरकारचा मानस आहे. हागणदारी मुक्तीत राज्याची उत्तम काम झाले असून महाराष्ट्र देशात अव्वल आहे. स्वच्छ भारत करण्याचे प्रधानमंत्री मोदींचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होत आहे.शौचालय निर्मिती हे रोजगार निर्मितीचेही साधन आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील ११ जिल्हे, १५५ तालुके आणि १६ हजार ९४५ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत. शौचालयाच्या निर्मितीमुळे संबंधित कुटुंबांचा आरोग्यावरील मोठा खर्च कमी होतो. गेल्या दोन वर्षात ४० लाख नवीन शौचालये राज्यात बांधण्यात आली आहेत. या बरोबरच आपल्याला प्रधानमंत्र्यांचे भारत बेघर मुक्त करण्याचे स्वप्न साकारायचे आहे. त्यासाठी सर्वांनी तयार राहणायचे आवाहन देवेंद्र फडणवीस यावेळी केले. बबनराव लोणीकर म्हणाले, २०१८ पर्यंत महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी शासनच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल असणारा महाराष्ट्र आपल्याला कायमच अग्रेसर ठेवायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी विजयकुमार देशमुख, सदाभाऊ खोत यांची भाषणे झाली. स्वच्छता दिंडीत प्रबोधनाचे काम करणाऱ्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शौचालयाच्या आदर्श प्रतिकृतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा- फडणवीस
By admin | Published: July 03, 2017 10:28 PM