मुंबई - भारतीय जनता पक्षाचा झंझावात आणि विरोधकांची झालेली वाताहत यामुळे अनेकांना विधानसभेत निवडून येण्याची भ्रांत आहे. तर ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे, त्यांना मंत्रीपदाची ओढ असून काहींना निर्माण केलेले साम्राज्या टिकून ठेवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षांतरावर जोर वाढला आहे. अनेक वर्षे विशिष्ट विचारांसाठी लढा देणारे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मात्र पक्षांतर करणाऱ्या सर्वच नेत्यांना दिलेला शब्द पाळणे सत्ताधाऱ्यांसाठी तितकेसे सोपे नाही. यातून अनेक जण डावलले जाण्याची शक्यता आहे. केवळ सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष बदलणाऱ्यांना डावलल्यामुळे राजकारणाचे एकप्रकारे शुद्धीकरणच होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात विविष्ट घरण्यांनी अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व गाजवले. ही घराणे बोटावर मोजण्याइतरप असली तरी याच घरण्यांकडे सत्तेच्या चाव्या अनेक दिवस होत्या. त्यामुळे शिक्षणसंस्था, कारखाने, सुतगिरण्या अशा संस्था उभारून या घराण्यांनी अमाप पैसा कमवला. तर अनेकांनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज करून ठेवले. परंतु, सत्ता गेल्यापासून या नेत्यांच्या साम्राज्याला धक्के बसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नेत्यांनी पक्षांतराची युक्ती काढली असून तूर्तास तरी त्यांच्यावरचे संकट टळल्याचे दिसत आहे.
पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळो वा ना मिळो, आमच्या साम्राज्याला धक्का लागायला नको, या अटीवर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विचारधारेचा मुद्दा येथे गौण ठरतो. तर काही शक्तीशाली नेत्यांनी प्रवेशासोबतच मंत्रीपदंही मिळवले. परंतु, हे मंत्रीपद त्यांच्यामुळे नव्हे तर संबधीत पक्षांला त्या-त्या जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी देण्यात आली. परंतु, त्याचवेळी भाजपला पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना देखील सांभाळावे लागणार आहे. विरोधकांपेक्षा हेच भाजपसमोरचे मुख्य आव्हान दिसत आहे.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षांतर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांची ही भूमिका पक्षांतर करून सुरक्षित राहण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्याला लुटणाऱ्या २५० घराण्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा पाटील यांनी दिला. या २५० घराण्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा सहभाग आहे. पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कारवाई झाल्यास, आयारामांसाठी ही बाब त्रासदायक ठरू शकते. यातून राजकारणाचे शुद्धीकरण होणार हे मात्र नक्की.