पुणे : सध्या ट्रोलिंगद्वारे सोशल मीडियावर खोटी माहिती खरी म्हणून पसरवली जाते आहे. यामध्ये कॉर्पोरेट्स, राजकारणी, सरकारद्वारे हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे पत्रकारांचे मुख्य काम हे सरकारी व्यवस्थेवर लक्ष ठेवणे आणि अन्यायाला वाचा फोडणे हे आहे. घटनांच्या पार्श्वभूमीवर मांडणी करताना आपली माध्यम म्हणून तेवढी क्षमता आहे याचा विचार करावा. तंत्रज्ञानामुळे माणसांसह शासन व्यवस्था बदलली आहे; परंतु पत्रकारांना बदलता आलेले नाही असे मत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी व्यक्त केले. पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, वि. अ. जोशी, विकास वाळुंजकर उपस्थित होते. दामले व बापट यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संदीप प्रधान यांना मुख्य पुरस्कार देण्यात आला. तर शंतनू डोईफोडे, ज्ञानेश्वर बिजले, नम्रता वागळे यांना आश्वासक पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला. दामले म्हणाले, ‘‘जशा वस्तू आणि सेवांचा सुकाळ झाला तस तसे पत्रकारिता बदलत गेली आहे. दूरदर्शनमुळे दृकश्राव्य माध्यमांना महत्त्व आले आहे. त्याचा भारतात मोठा परिणाम झाला आहे. ते मुद्रित पत्रकारितेचं पुढचं स्वरूप आहे. लोकांसमोर बातमी देण्याची घाई असल्याने सखोल माहिती देता येत नाही. पत्रकारांनी व्यवसायाशी एकनिष्ठता जपत वाचन वाढवले पाहिजे. आमिषांपासून दूर असावे. आपण खऱ्या अर्थाने माहितीचे स्रोत असतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासपूर्ण लिखाण व विवेचन कमीकमी होत चालले की काय अशी परिस्थिती आहे.’’ प्रास्ताविक उल्हास पवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सतीश देसाई यांनी केले. (प्रतिनिधी)बापट म्हणाले, पत्रकारांनी समाजाचे प्रबोधन करण्यासोबतच शासन आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे. पत्रकारिता हे समाजाला दिशा देणारे क्षेत्र असल्याने त्यांनी निर्भीडपणे लिखाण करावे. वाचन, अभ्यास, दांडगा संपर्क हे भिडे यांचे वैशिष्ट्य होते. पत्रकारांच्या पेन्शन आणि आरोग्याचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात काही पत्रकारांची भीती वाटते. त्यांना भेटलो नाही, जाहिरात दिली नाही की काहीतरी विरोधात छापून येण्याची भीती सतत असते. पूर्वी पत्रकारांना संपादकांचा दर्जा होता. पत्रकारांचे व्यावसायिक हेतू असतील तर सामाजिक आशय बातम्यांमधून उमटत नाही.’
व्यवस्थेवर अंकुश ठेवणे हे पत्रकारांचे मुख्य काम
By admin | Published: May 01, 2017 3:14 AM