मुंबई - राज्यातील नाट्यगृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे. मात्र बहुतांश नाट्यगृहे ही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने इच्छा असूनही आम्हाला काहीच करता येत नाही. त्यावर तोडगा म्हणून ही नाट्यगृहे देखभाल दुरुस्तीसाठी सांस्कृतिक विभागाला देण्यात यावीत, असा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे लवकरच पाठविला जाणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली. नाट्यगृहाची मालकी ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडेच राहील, आमची भूमिका केवळ देखभाल दुरुस्तीपुरतीच मर्यादित असेल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनामध्ये तावडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील नाट्यगृहांचे सर्वेक्षण झाले असून, कोणती नाट्यगृहे कोणत्या अवस्थेत आहेत याची वर्गवारी करण्यात आली आहे. कलाकार, रसिकांकडून अनेकदा नाट्यगृहांचा दर्जा सुधारण्याची मागणी केली जाते. मात्र राज्यातील बहुतांश नाट्यगृहे महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहेत. या नाट्यगृहांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी घेण्यास सांस्कृतिक विभाग तयार आहे़
देखभालीसाठी नाट्यगृहे सांस्कृतिक विभागाकडे - तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:27 AM