नाशिक : गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून मुदतीनंतर पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मैत्रेय कंपनीविरोधात सरकारवाडा पोलिसांत आतापर्यंत सुमारे आठ हजार पाचशे गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून,फसवणुकीची रक्कम २० कोटी रुपयांच्याही पुढे गेली आहे. कंपनीने इस्क्रोमध्ये भरलेली रक्कम न्यायालय व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये टप्प्याटप्प्याने गुंतवणूकदारांना परत केली जाणार आहे़ कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर यांनी इस्क्रो खात्यात पाच कोटी नऊ लाख रुपये जमा केले आहेत़ तक्रारदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे यांनी सांगितले़ मैत्रेयचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांच्या जामिनास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी २ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे़ तोपर्यंत सरकारवाडा पोलीसांत साडेसहा हजार गुंतवूकदारांनी तक्रारी केल्या होत्या, तर २० जून रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तक्रारींमध्ये तब्बल दोन हजारांनी वाढ झाली. मुदत संपूनही पैसे परत मिळत नसल्याने तसेच धनादेशही न वटल्याने गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या. (प्रतिनिधी)
‘मैत्रेय’च्या गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळणार!
By admin | Published: June 26, 2016 2:48 AM