मुंबई : भारतात आरोग्याविषयीची सुलभता आणि आरोग्यसेवेचे परवडणारे दर ही दोन महत्त्वाची आव्हाने सर्वांना भेडसावतात. ‘हेल्थकेअर : अ कमॉडिटी आॅर बेसिक ह्युमन नीड?’ या परिषदेच्या निमित्ताने प्रमुख धोरण नियोजनकार आणि या क्षेत्रातील विस्तृत भागधारकांना या विषयावर भूमिका मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणार आहे. सर्वप्रथम याविषयी सार्वत्रिक उपाययोजना ओळखाव्या लागतील, त्यानंतर वातावरणाशी निगडित छोट्या आणि मोठ्या प्रमाणावरील आरोग्यसेवा प्रणालीसाठी भारताकरिता स्वत:चे असे मॉडेल विकसित करावे लागेल, असे मत टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी व्यक्त केले.टाटा मेमोरियल सेंटरच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हेल्थकेअर : अ कमॉडिटी आॅर बेसिक ह्युमन नीड?’ या विषयावर २७ ते २९ जानेवारीदरम्यान तीनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या तीन दिवसीय परिषदेची माहिती सांगताना बडवे म्हणाले की, आरोग्यसेवा या क्षेत्रातील विस्तृत भागधारक, आरोग्य अर्थतज्ज्ञ, धोरण नियोजनकार, औषधोत्पादन कंपन्यांचे प्रमुख, प्रशासकीय तज्ज्ञ चिकित्सक, रुग्णांचे सल्लागार, साथरोगशास्त्रज्ञ तसेच अन्य तज्ज्ञ मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असून, विकसित आणि विकसनशील विश्वासाठी कमी खर्चात आरोग्यसेवा पुरवणारे मॉडेल तयार करण्यासाठी विचारमंथन करतील.याप्रसंगी, टीएमसीच्या सर्जिकल आँकॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सी. एस. प्रमेश यांनी देशातील असमानता आणि विविधतेच्या दृष्टीने आरोग्यसेवा प्रणालीची तातडीने गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला. तर सेंट ज्युड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्सचे संस्थापक निहार कविरत्ने म्हणाले की, प्रगतीचे वारे वाहत असतानाही, तशाच प्रकारची प्रगती तंत्रज्ञान आणि आरोग्याच्या बाबतीतही व्हायला हवी. मात्र देशातील हजारो लोकांना अद्यापही परवडतील असे उपचार करवून घेताना असंख्य अडचणी येताहेत, हे कटू वास्तव आहे.त्यामुळे ही तफावत कशी दूर करावी, यासाठी भारत सरकार आणि या क्षेत्रातील समभागधारकांनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)>या परिषदेत होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून ‘मुंबई डिक्लरेशन’चा संग्रह केला जाणार आहे, जेणेकरून भविष्यात राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य प्रणालीसाठी त्याचा फायदा होऊ शकेल.
‘सेवा सुलभता आणि दर ही आरोग्यसेवेतील मुख्य आव्हाने’
By admin | Published: January 21, 2017 5:47 AM