मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी मुंबईत करणार आहेत. जवळपास ८० टक्के चेहरे कार्यकारिणीत नवीन असतील असे म्हटले जाते. ६ सरचिटणीस, १६ उपाध्यक्ष, १६ सचिव यांच्यासह १०५ जणांची ही कार्यकारिणी असेल.
एरवी काही आमदारांना सरचिटणीस वा उपाध्यक्षपद दिले जाते. मात्र, यावेळी त्यांना ही संधी दिली जाणार नसल्याचे समजते. त्याऐवजी पक्षाच्या सर्व आमदारांना विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.
बदलास केंद्रीय नेतृत्वाची मान्यता प्रदेश कार्यकारिणीची यादी बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निश्चित केली आणि त्यास पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची मान्यता घेतली. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी फक्त सरचिटणीस बदलले होते. मात्र, अन्य कार्यकारिणी पूर्वीप्रमाणेच होती.
लवकरच नियुक्ती समन्वयकांची नियुक्ती लवकरच जाहीर केली जाईल. आमदारांकडे त्यांच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त असलेल्या मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक व नंतर विधानसभेची निवडणूक होईल. या निवडणुका समोर रचना केली जाईल.
संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून फीडबॅक? सरचिटणीस, उपाध्यक्ष व सचिव यामध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण दिले जाणार आहे. राज्यातील बहुतेक जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. त्यांच्या नावांची घोषणा १५ ते २० दिवसांत केली जाईल. जिल्हाध्यक्षपदासाठी प्रत्येक जिल्ह्यातून काही नावे काढण्यात आली. त्यांनी पक्षासाठी केलेले कार्य, विविध निवडणुकांमध्ये दिलेले योगदान, त्यांची प्रतिमा आणि जातीय समीकरणे अशा विविध कसोट्यांवर जिल्हाध्यक्ष निश्चित करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय फिडबॅकदेखील घेण्यात आला आहे, अशी माहिती आहे.