भंडारा: ठाकरे सरकार सत्तेत येऊन सत्तेत येऊन अडीच वर्षे होत आली आहेत. सरकार पडण्याच्या तारखा भाजप नेत्यांकडून वारंवार देण्यात आल्या. मात्र त्याचा काही परिणाम दिसला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच १० मार्चचा नवा मुहूर्त दिला. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीदेखील १० मार्चचा उल्लेख केला आहे. १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील, असं पटोलेंनी सांगितलं. ते भंडाऱ्यात बोलत होते.
सध्या ५ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यांचे निकाल १० मार्चला जाहीर होतील. १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये निश्चितपणे मोठे बदल पाहायला मिळतील, असं नाना पटोले म्हणाले. 'सध्या निवडणुका सुरू आहेत. माझं सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी बोलणं झालंय. १० मार्चपर्यंत संधी द्या. जे काही चाललंय आपल्या या सरकारमध्ये यालाही दुरुस्त करायची वेळ आपल्या हाती आहे. सरकारमध्ये आपले १२ मंत्री आहेत,' असं नाना पटोले पुढे म्हणाले.
नाना पटोलेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. १० मार्चनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कामगिरी समाधानकारक नसलेल्या मंत्र्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. आता सरकारमध्ये नेमके कोणते बदल होणार, काँग्रेस कोणत्या मंत्र्याला डच्चू देणार, कोणाला संधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.