अझहर शेख / नाशिक : जम्मु-काश्मिरच्या बंदीपोराजवळील हाजीन सेक्टरमध्ये ‘जैश’च्या अतिरेक्यांना यमसदनी धाडताना वीरमरण आलेले मुळ धुळे येथील बोराळा गावाचे सुपुत्र व वायू दलाच्या ‘गरूडा’ पथकाचे कमांडो सार्जन्ट मिलिंद किशोर खैरनार यांनी मुंबईवर झालेल्या २६/११चा अतिरेकी हल्ला उलथवून लावण्यामध्ये मोठे योगदान दिले होते.धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये शहीद मिलिंद यांचे बालपण गेले. त्यांनी शालेय शिक्षण तेथे पुर्ण केले. १६ डिसेंबर २००२ साली वायू दलात भरती झालेले मिलिंद यांचे शालेय वयापासून देशसेवेचे लक्ष्य ठेवले होते. साक्री येथे बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर धुळ्यातील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाच त्यांना सैन्यदलात जाण्याची संधी लाभली होती. सुरूवातीला सैन्याचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षणाबरोबरच मिलिंद यांनी तीन वर्षे पॅरा सैन्य, एनएसजी कमांडो असे सर्व प्रशिक्षण घेतले होते. २००४ साली वायू दलाने ‘गरूड कमांडो पथका’ची स्थापना केली. ‘गरूड’ कमांडो पथकाच्या पहिल्या सत्राचे जवान म्हणून मिलिंद यांना कर्तबगारी दाखविण्याची संधी मिळाली होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रसंगी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी राष्टÑीय सुरूक्षा दल (एनएसजी) गरूड कमांडो या विशेष पथकाच्या जवानांनी योगदान दिले होते. यावेळी मिलिंद यांनाही ‘गरूड कमांडो’च्या तुकडीत मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ला उधळण्यासाठी रवाना रवाना करण्यात आले होते. नरीमन हाऊस येथे हेलिकॉप्टरद्वारे उतरणाºया भारतीय सैन्य दलाच्या विविध विशेष कमांडो पथकांच्या जवानांमध्ये मिलिंद यांचाही सहभाग होता, अशी माहिती वीरपिता किशोर खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अतिरेक्यांशी झुंज देण्याची मिलिंद यांची पहिली वेळ नव्हतीजम्मूच्या बंदीपोरामधील हाजीन सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झुंज देण्याची मिलिंद यांची ही पहिली वेळ नव्हती तर भारतीय वायू दलात दाखल झाल्यानंतर दोन वर्षांमध्येच त्यांनी मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात अतिरेक्यांना कंठस्नान घालत हल्ला उलथवून लावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होते. हाजीनमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर चकमकीत उर्वरित दहशतवाद्यांना यमसदनी धाडताना ते शहीद झाल्याचे त्यांचे शालेय जीवनाचे मित्र राजकुमार राजकुवर यांनी सांगितले.