Congress Nana Patole News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही सर्व्हेनुसार, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडी बाजी मारण्याचा अंदाज आहे. तर काही कमी फरकाने महायुतीला सत्ता राखण्यात यश येईलच असे नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यातच लवकरच महायुतीत काही गडबड शक्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महायुती संदर्भात हात वरती केलेत, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत एकवाक्यता नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना आवाहन करूनही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत स्पष्ट भूमिका घेताना कुणी दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. बैठकीत आम्ही हे जाहीरपणे सांगितलेले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदापेक्षा महाराष्ट्र धर्म आणि संस्कृती तसेच महाराष्ट्र वाचवणे हे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य
निवडणुका कधी लागतील, हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयात बसतो. महायुतीमध्ये महाभारत चालले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. पुढील महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. या निकालाकडून फार अपेक्षा आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, लाल किल्ल्यावरून म्हणत होते वन नेशन वन इलेक्शन आणायचं आहे. मात्र देशांमधील चार राज्यातील निवडणुका घ्यायला ते घाबरत आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह आहे. कायदा आणि पोलिसांचा धाक राहिला नाही. थोडीशी भावना, थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपाने आणि पंतप्रधानांनी जळगाव येथील कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे ते उत्साह साजरा करत आहेत. हा कार्यक्रम जनतेच्या पैशाने झाला. शासकीय कार्यक्रम आहे. सर्वांत संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिला आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.