मुंबई - काँग्रेसचे मोठे नेते, त्यासह अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. उबाठा गटाचे काही आमदार आहेत त्यांचा पक्षप्रवेश १-२ दिवसांत होईल. पुढच्या ८ दिवसांत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळतील असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिरसाट माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, आज शिवसेनेच्या कोअर कमिटी, नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांनी, मंत्र्यांनी कुठले मतदारसंघ आपल्याकडे हवेत. कुठे काय स्थिती आहे याची चर्चा केली. बहुतेक मतदारसंघावर इतर पक्षाचे दावा करतायेत. त्यावर आग्रही भूमिका नेत्यांनी मांडली. ही निवडणूक लढवताना शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी त्या त्या मतदारसंघात त्या नेत्यांची कसं समन्वय साधला पाहिजे यावर चर्चा झाली. कुठल्याही मतदारसंघात आपला उमेदवार असेल तर भाजपा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्यासोबत कसे असले पाहिजे यावर चर्चा झाली असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय ही निवडणूक अटीतटीची आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची ही निवडणूक आहे. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीतील तिन्ही पक्षातील विभागीय समिती तयार केली आहे. ही समिती एकमेकांच्या संपर्कात राहिली. आपल्याला ही निवडणूक अत्यंत मेहनतीने जिंकायची आहे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कुणीही एकमेकांविरोधात बोलणार नाही याची काळजी घ्या, ज्या काही समस्या आहेत त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. ज्या मतदारसंघात आपले उमेदवार आहेत ते निवडून येतील यासाठी प्रयत्न करा. युतीत ३ पक्ष एकत्र येतात तेव्हा काही तडजोड कराव्या लागतात. जो उमेदवार असेल तो महायुतीचा असेल. ज्यांना तिकीट नाही त्यांच्याशी बोलून चर्चा झाली आहे. त्यांचे पूर्नवसन योग्य प्रकारे केले जाईल. येणाऱ्या २ दिवसांत सर्व आमदार, त्यानंतर जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे. मागच्या निवडणुकीत जे दुसऱ्या क्रमाकांवर होते त्यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे अशी माहितीही संजय शिरसाट यांनी माध्यमांना दिली. नाशिक, संभाजीनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर आम्ही आग्रही आहोत. त्यावर २ दिवसांत तोडगा निघेल असंही शिरसाट यांनी सांगितले.
राज ठाकरेंसोबत जुन्या आठवणींना उजाळा
राज ठाकरेंसोबत माझे आधीचे संबंध आहेत. शिवसेनाप्रमुखांसोबत राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर यायचे तेव्हापासून नाते आहेत. आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली. मी कुणाचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. जुन्या आठवणी एकमेकांसोबत शेअर केल्यात. गुढीपाडवा मेळाव्यात ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. आजच्या भेटीत त्यावर काही चर्चा नाही. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असं संजय शिरसाट यांनी सांगितले.
संजय राऊत पेटवायला सांगलीत गेले
संजय राऊत सांगलीला मशाल घेऊन पेटवायला गेलेत. राऊतांनी कदमांवर आरोप केले त्यावर विश्वजित कदमांनीही इशारे दिलेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झालीय हे स्पष्ट होतेय असं संजय शिरसाट यांनी सांगितले.