ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मुंबई व मुंबई उपनगरांतील आमदार निधीचा सर्वाधिक वापर स्वच्छतागृह बांधण्यासाठी झाला असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे सर्वेक्षण मुंबई व्होट्स या संस्थेचे सदस्य उदित बन्सल यांनी केले असून, त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमध्ये ही बाब समोर आली आहे. आमदार निधीपैकी २१ टक्के निधी हा स्वच्छतागृह बांधण्यासाठी वापरण्यात आला आहे. बन्सल यांनी मागवलेल्या माहितीनुसार गेल्यापाच वर्षात २१ टक्के आमदार निधी हा स्वच्छतागृह बांधण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच स्वच्छतागृह वगळता गुन्हे प्रतिबंध, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वात कमी निधी खर्च झाल्याचेही समोर आले आहे.
भांडुप येथील मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांनी ८१ % आमदार निधीचा वापर स्वच्छतागृहांवर खर्च केला आहे. तर, वर्सोव्यातील आमदार बलदेव खोसला यांनी १% आमदार निधी हा स्वच्छतागृहांवर खर्च केला आहे. शिवडीचे मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी ११४% निधीचा वापर स्वच्छतागृहांसाठी केला असून चांदिवली येथील काँग्रसेचे मंत्री नसीम खान यांनी ७६ % निधी खर्च केला आहे. खान हे सर्वाधीक कमी आमदार निधी वापरणारे आमदार असून त्यांनी या टक्केवारीला नकार दर्शवला आहे. आमदार निधी व्यतिरीक्त सरकारी योजनांतील इतरही निधी मी अनेक कामांसाठी वापरला आहे. असं त्यांनी म्हटले आहे. खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा सर्वाधिक निधी (३९%) हा स्वच्छतागृहांवरच खर्च झाला आहे. तसेच त्याव्यतिरीक्त त्यांनी झोपडपट्ट्यांतील रस्ते आणि गटारांचेही बांधकाम केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मी लोकल एरीया डेव्हलपमेंट फंड वापरत अनेक विकास कामे केली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ११ बगिचे, पोलीस चौकी आणि इतर निधीमधून ४२ सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच भाजपाचे आमदार योगेश सागर यांना प्रजा फाऊंडेशन या संस्थेने सर्वाधीक गुणांकन दिले आहे. त्यांनी ९४ टक्के आमदार निधीचा वापर केला असून, वापरण्यात आलेला निधी हा बगिचे, गुन्हे प्रतिबंधन, आरोग्य आणि शिक्षण यापैकी कशावरच खर्च झाला नाही अशी माहिती आहे. यावर त्यांनी प्रतिक्रीया देत त्यांनी असे सांगितले की, मी १८३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी वापरला आहे, तो शिक्षणासाठी झालेला खर्च नाही का, तसेच मी मुलींकरता स्वच्छतागृह बांधली आहेत. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांतील शाळांना मी संगणकाचे संच पुरवले आहेत. तसेच अनेक वस्त्यांमध्येही स्वच्छतागृहं बांधली आहेत. आमदारांना आमदार निधी वगळता दलित वस्ती योजना, झोपडपट्टी विकास निधी, वाल्मिकी आवास योजना, सुशोभीकरणासाठीचे निधी इत्यादी योजनांमार्फत निधी उपलब्ध होतो. असेही योगेश यांनी सांगितले आहे.