मुंबई- भारत देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काहीना काही सण असतो, असं म्हणायलाही काही हरकत नाही. वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. थंडीच्या दिवसात हा सण येतो. प्रत्येक सणाची तारीख ही दरवर्षी पंजागानुसार बदलते पण मकर संक्रात या सणाची तारीख कधीही बदलत नाही. दरवर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी याच तारखेला येते. मकर संक्रांतीला अध्यात्मिक व शास्त्रीय अशी दोन्ही महत्त्व आहेत. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसंच संक्रांतीनंतर ऋतूबदल व्हायला सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असं म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसंच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे.
मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. हिंदु संस्कृतीतील मकर संक्राती हा एकमेव असा सण आहे जो त्याच तारखेला येतो. याचं कारण म्हणजे तो सूर्याच्या (सूर्याच्या स्थानावर) कॅलेंडरनुसार बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर ८ वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण १५ जानेवारीला येतो. याआधी 2016 मध्ये संक्रांत 15 जानेवारी रोजी होती.
तीळ आणि गूळाचं महत्त्व काय ?मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या बनविल्या जातात. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असतो, असं आपण लहानपणापासूनच ऐकतो. पण या गोष्टीलाही वैत्रानिक दृष्टीकोन आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसंच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे.