मुंबई : लोकसभेप्रमाणे विधानसभेलादेखील आपण एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत. आता आपल्यासाठी लोकसभेची लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. अशावेळी कोणताही हट्ट न ठेवता लोकसभेसाठी व्यवहार्य जागावाटप करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे समजते.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १६ जागा मागितल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शाह यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून आले. शाह यांनी अन्य चौघांसोबत सह्याद्री अतिथिगृहावर रात्री उशिरापर्यंत चर्चा केली.
भाजपने केलेली सर्वेक्षणे, राज्यातील महायुतीची व महाविकास आघाडीची परिस्थिती, महायुतीत कोणत्या मतदारसंघात निवडून येण्याची कोणत्या पक्षाची क्षमता आहे, हे मुद्दे लक्षात घेऊन जागावाटप होणे आवश्यक असल्याचे मत शाह यांनी मांडले. हट्ट सोडा असे केवळ आपल्या दोघांनाच माझे म्हणणे नाही. भाजपचे नेतेदेखील अशा काही जागांसाठी अडून बसले असतील की जिथे भाजपपेक्षा मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, तेथे भाजपनेदेखील एक पाऊल मागे घेतले पाहिजे, असे शाह म्हणाल्याचे समजते.
जिंकून येण्याच्या निकषावर जागावाटप- ४८ जागांचे महायुतीत कसे वाटप करायचे, या संदर्भातही शाह यांनी यावेळी चर्चा केल्याची माहिती आहे. ज्याचे खासदार त्याला संधी, असे सूत्र न ठेवता आगामी निवडणुकीत जिंकून येणारा उमेदवार कोणाकडे आहे हे बघितले पाहिजे.- शिवसेनेकडे जे १३ खासदार आहेत त्या सगळ्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जाते. त्यापैकी एक किंवा दोन मतदारसंघ भाजपला मिळतील आणि त्या मोबदल्यात एक दोन नवे मतदारसंघ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतील, अशीही शक्यता आहे.- शाह हे महायुतीतील नेत्यांची बुधवारीदेखील चर्चा करतील. राज्यातील युवा नेत्यांना एकत्रित बसून निर्णय करण्यास सांगतील अशी शक्यता आहे.