नागपूर : संसदेचे कामकाज वर्षातून किमान १०० दिवस चालले पाहिजे. यासाठी वार्षिक कॅलेंडर तयार करून वेळापत्रक निर्धारित करण्याची गरज आहे. जर कॅलेंडर बनले तर पंतप्रधान आणि मंत्र्यांचे विदेशदौरे आणि राज्यातील निवडणुकांच्या कारणांमुळे कामकाज प्रभावित होण्याचा क्रम समाप्त होईल, असे मत माकपाचे ज्येष्ठ नेते व खासदार सीताराम येचुरी यांनी ‘संसद में व्यवधान : सामान्य सोच और हकीकत’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादात व्यक्त केले. संसदेचे कामकाज प्रभावित होऊ नये, हाच माझा प्रयत्न असतो. परंतु गोंधळामुळे कामकाज स्थगित होणे हे वाढत आहे. राज्यांतील विधानसभांमधील चित्र तर याहून वाईट आहे. सत्तापक्ष मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे कामकाजाचे कॅलेंडर तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे निवडणूक आयोग अधिवेशनाच्या काळात निवडणुका घेणार नाही व या कालावधीत विदेश दौरेदेखील होणार नाही, असे येचुरी म्हणाले. यावेळी येचुरी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या गदारोळावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. केंद्रातील मंत्री वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. धर्मांतरण आणि घरवापसी यासारखे मुद्दे तापले आहेत. अशास्थितीत विरोधकांकडून केवळ सरकारला उत्तर मागण्यात येत होते. वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होती. परंतु मंत्र्यांनी क्षमा मागितली आहे इतकेच पंतप्रधानांनी म्हटले. धर्मांतरणाच्या मुद्यावर राज्यसभेत गोंधळ सुरू असताना मोदी यांना तब्बल एक तास मौन बाळगावे लागले, याकडे येचुरी यांनी लक्ष वेधले.लोकसभेच्या सदस्याला हिरव्या रंगाचे तर राज्यसभेच्या सदस्याला लाल रंगाचे कार्ड मिळते. यातून हे स्पष्ट होते की, राज्यसभेचे काम विधेयक रोखणे आहे. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे अध्यादेश जारी करण्यात येत आहेत. ही कृती देशाच्या भविष्यासाठी चांगली नाही. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना विश्वासात न घेता थेट बुलडोझर चालविण्याच्या वृत्तीमुळे गदारोळ होतो. संसदेत चर्चा हा यावरील मार्ग आहे. सरकारने चर्चेपासून घाबरणे योग्य नाही, असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)पेट्रोल ५० रु. तर डिझेल ३० रु. लिटर व्हावेआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे सरकारला तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याऐवजी अबकारी शुल्कात दोनदा वाढ केली. तेलाच्या घसरणीमुळे देशात पेट्रोलचे दर ५० रुपये आणि डिझेलचे दर ३० रुपये व्हावे. विरोधी पक्ष अशी मागणी करीत असेल तर विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नाही, असा आरोप होतो. तो चुकीचा आहे, असा दावा येचुरी यांनी केला.कुठल्या भाषेत बोलू?सीताराम येचुरी यांनी आपले बोलणे सुरू करण्याअगोदर नेमक्या कुठल्या भाषेत बोलू, अशी उपस्थितांना विचारणा केली. तेलगू कुटुंबात जन्म झाल्याने तेलगू भाषा येते. तामिळनाडूत राहिल्याने तामिळ येते. बंगालमध्ये शिक्षण झाले त्यामुळे बंगालीदेखील येते. इंग्रजी व हिंदी तर येतेच. त्यामुळे तुम्हीच सांगा मी कुठल्या भाषेत बोलू असे त्यांनी विचारताच सभागृहातून ‘हिंदी-हिंदी’ असे त्यांना उत्तर मिळाले व त्यांनी हिंदीतून आपले विचार मांडले.
संसदेच्या कामकाजाचे वार्षिक कॅलेंडर बनावे
By admin | Published: January 08, 2015 1:27 AM