सातारा : ‘लोकांचे ज्ञान मिळविण्याची इच्छा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत पुस्तकाला मरण नाही. देशातलं पहिलं पुस्तकाचं गाव असणाऱ्या भिलार गावातील सुज्ञ आणि साहित्यप्रेमी ग्रामस्थांनी ग्रंथसंपदेसाठी आपले घर देऊन दातृत्व दाखवलं आहे. आता प्रकाशकांची जबाबदारी वाढली आहे. लोक लग्नासाठी जयपूरसारखं ‘डेस्टिनेशन’ निवडतात. अगदी त्याच पद्धतीने प्रकाशकांनी पुस्तकांच्या प्रकाशनासाठी भिलार गावाला प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन गुरुवारी महाबळेश्वरजवळील भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आदी उपस्थित होते.महाराष्ट्रात वाचन संस्कृती नवीन नाही. मराठी ही भाषा समृद्ध आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही राहिलेले आहे. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यिकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेवर जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा अन्य भाषेवर होत नसावी, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, आज भिलारवासीयांनी नवीन पाऊल टाकत असताना इतिहासही रचलेला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारा पर्यटक भिलारला भेट दिल्याशिवाय जाणार नाही. एवढं कर्तृत्व या गावाने करून दाखविले आहे. साहित्यातून ज्ञानाची कक्षा रुंदावत असते. वाचन केल्याने माणूस प्रगल्भ बनतो. आपल्या देशात स्वातंत्र्याच्या काळात साहित्याने मोठी भूमिका बजावलेली आहे. तसेच जगात जेवढ्या राज्यक्रांती झाल्या, त्यातही साहित्याचे मोठे योगदान आहे. आपण डिजिटल जगात वावरत असलो तरी वाचनाची सवय मात्र कमी होत नसते. ज्ञान वाचनातून मिळते, कीर्तनातूनही मिळते. त्यामुळे साहित्य संस्कृती संपू शकत नाही. (प्रतिनिधी) विदेशात नेते मजा मारायला जात नाहीत - तावडे‘सजग, संवेदनशील समाजाची पायाभरणी करणारा हा प्रकल्प आहे. नेते विदेश दौरे करतात, त्यावर वारंवार टीका केली जाते. मात्र, विदेशाचा दौरा करताना डोळसपणे पाहिल्यामुळेच ‘पुस्तकाचे गाव’ हा प्रकल्प सुचला होता. त्यामुळे नेते विदेशात मजा मारायला जात नाहीत, हे सर्वांनीच लक्षात घ्यावे,’ असा चिमटा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढला.
भिलारला पुस्तक प्रकाशनस्थळ करा
By admin | Published: May 05, 2017 3:54 AM