मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खाजगी टॅक्सी कंपन्यांना जीपीएस यंत्रणेवर भर देण्याबरोबरच त्याचे एकत्रित नियंत्रण कक्ष सुरू करण्याची सूचना परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी खासगी टॅक्सी कंपन्यांच्या आॅपरेटर्सना दिले आहेत. बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पुढील निर्णय सोमवारपर्यंत ढकलण्यात आला आहे. नवी दिल्लीत उबेर टॅक्सीत एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली आणि त्यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. महिला प्रवाशांबरोबरच सर्वच प्रवाशांच्या सुरक्षेचा मद्दा पुढे नेत राज्य परिवहन विभागाने त्यावर लक्ष केंद्रित केले आणि खासगी टॅक्सी कंपन्यांसोबत बैठक घेऊन सुरक्षेसंदर्भात ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात काही सूचनाही केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे खासगी टॅक्सींमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यापासून त्याचे नियंत्रण कक्ष असावे, यावर परिवहन विभागाकडून भर देण्यात आला. सध्या बड्या टॅक्सी कंपन्यांनी जीपीएस यंत्रणा टॅक्सींमध्ये बसविली असली तरी काही कंपन्या अजूनही यामध्ये मागे आहेत. स्वत:च्या मालकीच्या गाड्या न घेता त्या भाड्याने घेणे आणि चालकही भाडेतत्त्वावर ठेवण्याचे काम या कंपन्यांकडून केले जाते. अशा खासगी कंपन्यांच्या टॅक्सींमध्ये मोबाइल अॅप्सवरून जीपीएस यंत्रणा हाताळली जाते. या टॅक्सींमध्ये जीपीएस यंत्रणा स्वतंत्रपणे बसविली नसल्याने प्रवाशांनाही मोबाइल अॅपवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे ही यंत्रणा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने स्वतंत्र यंत्रणा खासगी टॅक्सींमध्ये असावी आणि या सर्व टॅक्सी कंपन्यांचे एकत्रित नियंत्रण कक्ष असावे, अशी भूमिका परिवहन विभागाने घेतली असून, तशा सूचना बुधवारी खासगी टॅक्सी कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत केल्या आहेत. (प्रतिनिधी)
जीपीएस नियंत्रणाचा एकत्रित कक्ष करा
By admin | Published: April 23, 2015 5:33 AM